पुण्यातील शंकरशेठ रस्त्यावर १४ सप्टेंबरला मध्यरात्री अडीच वाजता ढोले चौकात (सेव्हन लव्हज चौक) कारची रिक्षाला मागून धडक बसून अपघात झाला. यात रिक्षाचे नुकसान झाले होते. त्यामुळे भरपाईवरून रिक्षाचालक आणि कारचालक यांच्यात वादावादी सुरू होती, तेव्हा दुचाकीवरून तीन जण तेथे आले. कारचालकाने रिक्षाचालकास भरपाई दिल्यानंतर रिक्षाचालक तेथून निघून गेला. मात्र, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कारचालकाशी झटापट करून त्याच्या खिशातील २० हजार रुपये आणि १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल जबरदस्ती काढून घेतला होता. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अपघाताचा बनाव करून लूट केली असण्याच्या शक्यतेने पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याने कारचालकाशी वाद घालून नुकसानभरपाई घेतल्याप्रकरणी त्याच्यावरही गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्याच्याकडे अन्य तिघांविषयी चौकशी असता, ‘मी त्यांना ओळखत नाही,’ असे त्याने सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्हींचे चित्रीकरण तपासून भिमाले संकुल येथे सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा मोबाइल आणि पाच हजार रुपये असा माल जप्त केला.
दरम्यान, खडक पोलिसांनी अवघ्या २४ तासामध्ये आरोपींना बेड्या ठोकल्यानं त्यांच्या कामगिरीचं कौतुक होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.