कोलंबो: भारत ठरला आशिया किंग २०२३. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताने १० विकेट्सने विजय मिळवत आशिया चषक २०२३ चे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. गेल्या बऱ्याच वर्षात भारताने एकही मोठी टूर्नामेंट न जिंकल्याचा दुष्काळ भारताने आशिया चषक जिंकून संपवला आहे. भारताकडून सलामीला आलेल्या शुभमन गिल आणि इशान किशन यांनी अवघ्या ६ षटकात सामना भारताच्या नावे केला. श्रीलंकेने भारताला सर्वात कमी ५१ धावांचे आव्हान दिले होते. भारताकडून इशान किशन आणि शुभमन गिलच्या वेगवान फलंदाजीने श्रीलंकेच्या गोलंदाजांना खेळण्याची संधी दिली नाही. रोहित शर्मा सलामीसाठी न उतरता त्याने इशान आणि गिलची जोडी पाठवली. रोहित शर्माने आणि संघाने दाखवलेला विश्वास या दोघांनीही सार्थ करून दाखवलं आणि संघाला विजय मिळवून देतच परतले. भारताने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आपली पकड मजबूत ठेवली होती. या अंतिम सामन्यात श्रीलंकेने केवळ नाणेफेक जिंकली पण सामन्यात त्यांना एकदाही आपला प्रभाव पाडण्याची संधी भारताच्या खेळाडूंनी दिली नाही. श्रीलंकेने नाणेफेक जिंकत भारताला गोलंदाजीसाठी पाचारण केले आणि भारताच्या वेगवान गोलंदाजांपुढे लंकेचा संपूर्ण संघ गडबडला. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात विकेट घेत लंकेला धक्का दिला आणि मग मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात ४ विकेट घेत लंकेचे कंबरडे मोडले. त्यानंतर सिराजने मेंडिस आणि शनाका यांच्या क्लीन बोल्ड विकेट घेत श्रीलंकेचे मोठ्या धावसंख्येचा स्वप्न धुळीस मिळवले. मग हार्दिक पांड्याने ३ विकेट्स घेत लंकेला ५० धावांवर ऑल आऊट केले.