Solapur a teacher died in an accident on the fifth day after buying a new car; शिक्षकाने नवीकोरी कार घेतली, पण पाचव्याच दिवशी घात झाला; सासरी जाताच थेट विहिरीत कोसळले
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ईरन्ना बसप्पा जूजगार (वय ४१ वर्ष, राहणार मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड सोलापूर) या शिक्षकाने नवीन कार घेतली होती. कार घेऊन पाच ते सहा दिवस झाले होते. घरात पहिल्यांदाच चार चाकी वाहन आल्याने शिक्षकाचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यामुळे पाच दिवसांपूर्वी घेतलेली नवीन टीयागो कार घेऊन संपूर्ण कुटुंबासहित ईरन्ना जुजगार हे रविवारी मेहुण्याच्या घरी पेढे द्यायला गेले होते. कार चालवायला येत नसल्याने ईरन्ना यांनी खाजगी वाहनचालक सोबती घेतला होता. सासरकडील लोकांना नवीन कार दाखवायचे निमित्त होते. मात्र झाडाखाली लावलेल्या कारची ट्रायल घेतानाच ईरन्ना जुजगार यांचं नियंत्रण सुटलं आणि कार घेऊन ते थेट विहिरीत कोसळले. दुर्घटनेची माहिती मिळताच आरडाओरडा करत इतर ग्रामस्थांनी थेट विहिरीत उड्या मारून ईरन्ना जुजगार यांना विहिरीच्या बाहेर काढलं आणि शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील भाटेवाडी (डोणगाव शिवार) येथे घडली.
दुपारी साडेबारा ते १ वाजता सोलापूरहून भाटेवाडी शेतात सर्व कुटुंबीय गाडीतून आले. सर्व कुटुंबीय व कार ड्रायव्हर घरात गेले. त्यावेळी शिक्षक इराण्णा झुजगार हे ड्रायव्हर सीटवर बसले आणि ही कार झाडाखाली लावण्यासाठी स्टार्ट केली. मात्र नियंत्रण सुटल्याने ही कार सुसाट वेगात समोरील विहिरीमध्ये क्षणार्धात जाऊन कोसळली. नातेवाईक चंद्रशेखर आमले यांनी इतरांच्या सहकार्याने त्यांना पाण्याबाहेर काढून सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मयत शिक्षक इराण्णा यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
ईरन्ना जुजगार हे सोलापूर जिल्ह्यातील वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक होते. त्यांचे मूळ गाव मैंदर्गी आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी दुपारी शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची व मित्रमंडळीची मोठी गर्दी झाली होती. मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.