महाराष्ट्रासमोर मोठं संकट; पाणीसाठ्याची धक्कादायक आकडेवारी समोर, कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती? – big crisis in maharashtra shocking statistics of water storage in front
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी सुमारे ९५ तालुक्यांतील धरणांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या तालुक्यांत पाण्याची स्थिती बिकट झाली आहे. राज्यात सद्यस्थितीत ६८ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा २० टक्क्यांनी कमी आहे. सांगली, सोलापूर, नगर, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची धग वाढत असून, या तालुक्यांमध्ये पाणीसाठा अत्यल्प असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात जुलैनंतर सलग जोराचा पाऊस झालेला नाही. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अधूनमधून पाऊस झाला असला, तरी धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होईल, एवढी त्याची तीव्रता नव्हती. ऐन पावसाळ्यात ऑगस्ट आणि त्यानंतर आता सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यामध्येही पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र राज्यभर आहे. काही जिल्ह्यांमध्ये तुरळक स्वरुपात पावसाने हजेरी लावली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती खराब असल्याचे निरीक्षण जलसंपदा विभागाने नोंदविले आहे.
राज्यात ३५८ तालुके आहेत. त्यापैकी ९५ तालुक्यांमध्ये कमी पाणीसाठा असून, शून्य ते १९ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा शिल्लक राहिल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. पुणे विभागात पुरंदर, बारामती, दौंड; तसेच माण, खटाव या तालुक्यांमध्ये पाणीसाठा कमी आहे. सोलापूर जिल्ह्यांमध्ये सर्वांत बिकट स्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माळशिरस, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये पाण्याची स्थिती चिंताजनक आहे. नगर, सांगली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, बुलढाणा, जळगाव, जालना, धाराशिव या जिल्ह्यांतील बऱ्याच तालुक्यांमध्ये पाणीसाठा कमी असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.
विभागनिहाय पाणीसाठ्याची स्थिती (टक्क्यांत)
विभागाचे नाव….. १५ सप्टेंबरचा पाणीसाठा….१५ सप्टेंबर २०२२चा साठा