मुंबई : गणेशोत्सवकाळात भक्तांना मुंबईतील विविध गणपतींचे दर्शन घेता यावे, यासाठी बेस्टने रात्रभर बससेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत २० पेक्षा अधिक बसगाड्या चालवण्यात येणार असून गणेशोत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसांत ही सुविधा देण्याचे नियोजन असल्याची माहिती बेस्ट उपक्रमातील सूत्रांनी दिली.

मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच मुंबई महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाच्या सभागृहात मुंबई पोलिस, रेल्वे, बेस्ट, रेल्वे सुरक्षा बल यांसारख्या विविध प्राधिकरणांची बैठक घेतली होती. या बैठकीत, गणेशोत्सवकाळात मुंबईत फिरणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून बेस्ट आणि रेल्वेने रात्रभर सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना त्यांनी केली होती. या सूचनेनुसार बेस्ट उपक्रमाने नियोजन केले आहे. गणेशोत्सवकाळात पहिल्या पाच दिवसांत घरगुती गणपतीनिमित्त अनेक जण गावी जातात किंवा काहींच्या मुंबई महानगरातील घरीच गणपती येतो. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने शेवटच्या पाच दिवसांत मुंबईत रात्रभर बससेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित बसगाड्यांव्यतिरिक्त २० ते २८ जादा बसगाड्या या रात्रभर सेवा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाच ते सहा विविध मार्गांवर या बस चालवण्यात येणार आहेत. या बसगाड्यांची सेवा २४ तास असेल.

Mumbai Local: मुंबईकरांसाठी गोड बातमी; गणेशोत्सवादरम्यान मेगाब्लॉक नाही, सविस्तर जाणून घ्या…
शहर भागात मोठमोठ्या मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी मुंबई उपनगरातून मुंबई शहराकडे येणाऱ्यांचा ओढा अधिक असतो. हे लक्षात घेता उपनगरातून शहराच्या दिशेने या विशेष बसगाड्या चालवण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये काही साध्या, तर काही एसी सिंगल डेकर बस असणार आहेत. दादर, करी रोड, चिंचपोकळी, भायखळा, मुंबई सेंट्रल आदी भागांसाठी या जादा बस असतील.

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून तात्पुरती सुटका? सहा लाख नागरिक कोकणात, १,१०७ जादा एसटी गाड्या रवाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here