मुंबई : गणेशोत्सव दोन दिवसांवर आला असताना रविवारी खरेदीसाठी बाजारपेठा फुलून गेल्या. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, लोहार चाळ, दादर मार्केट, भुलेश्वर आदी भागात मुंबईकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. त्यातून बाजारातही चैतन्य पसरले.

करोनानंतर यंदा गणेशोत्सवाच्या खरेदीचा उत्साह सर्वत्र दिसून येत होता. त्यातून बाजारातही मालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. फुलांचा बाजारही चांगलाच फुलून गेला होता. त्यात कृत्रिम फुलांनी भर घातली होती. रविवारी सुट्टी साधून अनेकजण कुटुंबासह खरेदीसाठी दाखल झाले होते. त्यातून बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यंदा मोठ्या संख्येने कृत्रिम फुले बाजारात आली होती. तसेच क्रॉफर्ड मार्केट परिसर या कृत्रिम फुलांच्या दुकानांनी फुलला होता. बाजारात यंदा मोरपिसांसह प्लास्टिकची कमळे, रंगीबेरंगी फुलांच्या माळा, गालिचे, थर्माकॉलवर चिकटविलेली फुलांची आरास, तोरणे आदींची रेलचेल होती. ‘यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याने अनेकांनी नव्याने दुकाने थाटली होती. त्यातून क्रॉफर्ड मार्केट परिसरात प्लास्टिकच्या फुलांच्या विक्रेत्यांची संख्या वाढली होती. त्यातून मालाची अधिक आवक झाल्याने गणेश आगमनाच्या शेवटच्या रविवारी विक्री वाढविण्यासाठी विक्रेत्यांनी फुलांचे दर कमी केले होते. गेल्यावर्षी ५० रुपयांना विकली जाणारी प्लास्टिकच्या फुलांची माळ यंदा ३० रुपयांना विकली जात होती’, अशी माहिती विक्रेते अहमद रजाक यांनी दिली.

Mumbai News: मुंबईकरांना रात्रभर बाप्पाचं दर्शन घेता येणार, बेस्टचा ‘लई बेस्ट’ निर्णय
विद्युत रोषणाईवर मंडळांचा खर्च

दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारात गणपतीच्या सजावटीसाठी प्रकाश दिव्यांच्या खरेदीसाठी उत्साह दिसून येत होता. ‘दरवर्षी गणपतीसाठी प्रकाश माळांच्या खरेदीला गणपती आगमनाच्या १५ दिवस आधीपासून सुरुवात होते. यंदा मात्र एक ते दीड महिन्यांपासूनच प्रकाश माळा खरेदीसाठी लगबग सुरू होती. त्यामध्ये सर्वाधिक खरेदी मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मंडपांच्या सजावटीसाठी प्रकाश माळांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. त्या तुलनेत घरगुती गणपतींसाठी खरेदी कमी राहिली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा व्यवसाय चांगला झाला’, अशी माहिती लोहार चाळीतील जे. एल. लाइट्सचे प्रज्ज्वल पाटील यांनी दिली.

गुलछडीला भाव; झेंडू, शेवंतीचे दर घसरले

बाजारात कृत्रिम फुलांची खरेदी वाढल्याने त्याचा फटका ताज्या फुलांना बसला. बाजारात रविवारी झेंडू, शेवंतीची फुले मोठ्या प्रमाणात दाखल झाली होती. त्यातून घाऊक बाजारात झेंडू आणि शेवंतीचे भाव घसरले. ‘घाऊक बाजारात झेंडू ४० ते ६० रुपयांना, तर शेवंती ५० ते ८० रुपयांना विकली जात होती. यंदा २० गुलाबांसाठी १०० ते १५० रुपयांचा भाव होता. त्याचवेळी गुलछडीची आवक घटल्याने तिचे भाव वधारले. घाऊक बाजारात रविवारी गुलछडीचे दर ४०० रुपयांपर्यंत वधारले’, अशी माहिती दादर येथील स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे फुल मार्केटमधील व्यापारी राजेंद्र हिंगणे यांनी दिली.

भाजपचे मित्र अन् विरोधकांची एकमुखी मागणी; मोदी सरकार महिलांसाठी मोठा निर्णय घेणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here