Vijay Wadettiwar Attacked on Ajit pawar Over kantrati Bharti;स्वतःला मोठा नेता म्हणून घेत असाल तर हे पाप तुम्ही करू नका, वडेट्टीवारांनी अजित पवारांना सुनावलं
चंद्रपूर : राज्य सरकारच्या कंत्राटी नोकरीच्या धोरणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झालेत. ९ खाजगी कंपन्यांना कंत्राट देऊन नोकर भरती करण्याता निर्णय सरकारने घेतलाय. राज्य शासनाने तसा अध्यादेश काढला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला इशारा दिलाय. हे नालायक सरकार राज्यातील तरुणाई उद्धवस्त करायला निघालंय. मुलांनो रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, जोपर्यंत हे सरकार अध्यादेश वापस घेत नाही तोपर्यंत मागे हटू नका, असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलंय. त्याचवेळी अजित पवारांवरही त्यांनी निशाणा साधला. स्वतःला मोठा नेता म्हणून घेत असाल तर हे पाप तुम्ही करू नका. अजित पवार खोटं बोलून तरुणांना फसवत आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. राज्याच्या काही विभागांमध्ये तातडीने पदभरती करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध विभागांमध्ये कंत्राटी स्वरूपात पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कंत्राटी पदभरतीचा निर्णय हा कायमस्वरूपी नसून, तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यांच्या या स्पष्टीकरणावर विजय वडेट्टीवारांनी तीव्र आक्षेप नोंदवत दादांना आरसा दाखवला.
स्वतःला मोठा नेता म्हणाविणारे अजित पवार खोटं बोलून तरुणांची फसवणूक करीत आहेत. अजित पवारांवर माझा हा थेट आरोप आहे. दिशाभूल करणारे वक्तव्य करू नका. महाराष्ट्रातील तरुणांना फसवू नका. तुम्ही पक्ष फोडून गेलात, हा तुमच्या विषय आहे. आता तरुणांना उद्धवस्त करण्याचे पाप तरी करू नका, अशा शब्दात वडेट्टीवारांनी अजित पवार यांना सुनावलं.
६ सप्टेंबर २०२३ हा शासन अध्यादेश लागू झाला. हा निर्णय आधीच्या सरकारचा होता, असं हे सरकार सांगतंय. आमच्या वेळी हा निर्णय केवळ पंधरा प्रवर्गासाठी होता. त्यामध्ये डाटा ऑपरेटर संगणक चालक यांचा समावेश होता. सरकारने त्यामध्ये बदल करून शिपाई ते इंजिनियर या सर्वच पदांचा समावेश केला. पन्नास हजार वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दहा हजार रुपये थेट या कंपनीकडे जातील. उद्या ही कंपनी २० हजार रुपये वेतनावर ठेवेल. त्यामुळे राज्यातील तरुणांचे भविष्य उद्धवस्त होईल, असं वडेट्टीवार म्हणाले.
बछड्यांना नाव देण्यासाठी अजितदादांनी चिठ्ठी काढली; ‘आदित्य’ नाव ठेवण्यास विरोध