न्यूयॉर्क: खाल्ल्यानं झालेल्या संसर्गामुळे महिलेला दोन्ही हात, पाय गमावेवे लागल्याची घटना घडली आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील सॅन जोसमध्ये राहणाऱ्या ४० वर्षीय लॉरा बाराजस नावाच्या महिलेनं तिलापिया मासा खाल्ला. मासा पूर्ण शिजलेला नसल्यानं लॉरा यांना संसर्ग झाला. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र त्यांचे दोन्ही हात, पाय कापावे लागले.मासे खाणं आम्हा सगळ्यांनाच महागात पडलं. घडलेला प्रकार भयंकर असून तो कोणासोबतही घडू शकतो, असं बाराजस यांची मैत्रीण अॅना मेसिना यांनी सांगितलं. बाराजस यांनी सॅन जोसमधील एका स्थानिक मंडईतून मासे आणले होते. मासे खाल्ल्यानंतर त्या आजारी पडल्या. मासा तिनं घरातच शिजवला होता. तिनं जवळपास जीव गमावला होता, असा घटनाक्रम मेसिना यांनी कथन केला.बाराजस कोमामध्ये होत्या. त्यांची बोटं, पाय आणि ओठ काळे पडले होते. किडनी खराब होत होती. जवळपास महिनाभर त्या रुग्णालयात होत्या. त्यांचा जीव वाचला असला तरी उर्वरित आयुष्य त्यांना हातापायांशिवाय काढावं लागणार आहे. बाराजस यांच्या मदतीसाठी मेसिना प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी निधी संकलन सुरू केलं आहे. या माध्यमातून त्यांना आतापर्यंत २० हजार डॉलरपेक्षा अधिक निधी मिळाला आहे.बाराजस यांना विब्रियो वल्निकसचा संसर्ग झाला होता. याबद्दल अमेरिकेच्या सीडीसीनं सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरवर्षी अशा प्रकारच्या १५० ते २०० घटना घडत असतात. हा संसर्ग झालेल्या पाचपैकी एकाचा मृत्यू होतो. बऱ्याचदा हे मृत्यू एक ते दोन दिवसांमध्येच होतात. दूषित पाण्यातील, घाव असलेले मासे खाल्ल्यानं विब्रियो वल्निकसचा संसर्ग होतो, अशी माहिती संसर्गरोग तज्ज्ञ असलेल्या डॉ. नताशा स्पोटिसवूड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here