रास्ता रोको करत शासनाच्या आदेशाची होळी
राज्य सरकारने उच्चवर्गातील सरकारी जागा ही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय या जागा भरण्यासाठी कंपन्यांना कंत्राट देण्यात आले असून यामध्ये या कंपन्यांना कमिशन देखील देण्यात येणार आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या सर्वाविरोधात स्वाभिमानी विद्यार्थी परिषद आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने कोल्हापुरातील इचलकरंजी फाटा येथे रास्ता रोको करत शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली आहे. हे आंदोलन सौरभ शेट्टींच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तब्बल अर्धा ते पाऊण तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शासनाचा निर्णय तरुणांच्या जखमेवर मीठ चोळणारा
राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय अनेक तरुणांचे भविष्य अंधारात ढकलणारा असून या निर्णयामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. हा आदेश मागे घ्यावा यायासाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषद रस्त्यावरची लढाई लढेल, असा इशारा सौरभ शेट्टी यांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील राज्य सरकार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. पंतप्रधानांनी निवडणुकीपूर्वी दोन कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचे पुढे काय झाले हे अद्यापही तरुणांना समजलेले नाही. तोवरच आपल्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्रामध्ये सरकारी भरतीसाठी कंत्राटी धोरण अवलंबून तरुणांच्या उरल्यासुरल्या आशाही धुळीला मिळवल्या आहेत. चुकीचा पायंडा पाडण्याच्या निर्णयाने तरुणांमध्ये नैराश्य वाढत जाण्याचा मोठा धोका आहे. यातून आपल्याला युवकांच्या होणाऱ्या आत्महत्या पाहावयाच्या आहेत की काय ? असा खडा सवालही सौरभ शेट्टींनी उपस्थित केला आहे.