या तारखांना शेअर बाजार बंद राहील
शेअर बाजाराच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, गणेश चतुर्थीनिमित्त १९ सप्टेंबर रोजी मार्केट बंद राहणार आहे. यानंतर २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती, २४ ऑक्टोबरला दसरा, १४ नोव्हेंबरला दिवाळी बलिप्रतिपदा, २७ नोव्हेंबरला गुरु नानक जयंती आणि २५ डिसेंबरला ख्रिसमसच्या निमित्ताने सेन्सेक्स आणि निफ्टी बंद राहतील. १२ नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात फक्त मुहूर्त ट्रेडिंग असेल. मुहूर्ताच्या ट्रेडिंगच्या वेळा नंतर जाहीर केल्या जातील.
बाजार तेजीसह बंद झाला
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी शेअर बाजारातही तेजी दिसून आली. बाजार तेजीसह बंद झाला. बीएसईच्या ३० समभागांवर आधारित निर्देशांक सेन्सेक्स सलग ११व्या दिवशी वधारत होता. सेन्सेक्स ३१९.६३ अंकांनी किंवा ०.४७ टक्क्यांनी वाढून ६७,८३८.६३ च्या विक्रमी पातळीवर बंद झाला. व्यापारादरम्यान, तो एकेकाळी ४०८.२३ अंकांवर चढून विक्रमी ६७,९२७.२३ वर पोहोचला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) निर्देशांक निफ्टी देखील ८९.२५ अंकांनी किंवा ०.४४ टक्क्यांनी वाढून २०,१९२.३५ च्या नवीन शिखरावर बंद झाला. ट्रेडिंग दरम्यान तो २९,२२२.४५ च्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता.
या शेअर्समध्ये वाढ
सेन्सेक्स समूहात समाविष्ट असलेल्या कंपन्यांमध्ये भारती एअरटेलला सर्वाधिक २.३७ टक्क्यांनी वाढ मिळाली. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, एचसीएल टेक, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, विप्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, अॅक्सिस बँक आणि नेस्ले हे शेअर्सही वाढीसह बंद झाले. दुसरीकडे, एशियन पेंट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह आणि एनटीपीसीचे शेअर्स घसरत होते.
आशियातील इतर मार्केटमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्की आणि हाँगकाँगचा हँग सेंग वाढीसह बंद झाला तर चीनचा शांघाय कंपोझिट इंडेक्स तोट्यात होता. युरोपीय शेअर बाजार तेजीसह व्यवहार करत होते. एक दिवस आधी गुरुवारी अमेरिकन बाजार तेजीत होते.
मार्केटची वाटचाल कशी असेल?
जाणकारांच्या मते, गेल्या आठवड्यात शेअर बाजारात सातत्याने वाढ होत आहे. बाजारात गुंतवणूकदारांची चांगली खरेदी दिसून येत आहे. अशा स्थितीत शेअर बाजार पुढील आठवड्यातही तेजीने सुरू होऊ शकतो. पुढील आठवड्यातही बाजारात तेजी येऊ शकते. मात्र, बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी एकदा नक्की चर्चा करा.