मुंबई : गणरायाचे आगमन निर्विघ्नपणे पार पाडून भाविकांना आनंददायी वातावरणात उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई रेल्वे पोलिसांसह रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), महाराष्ट्र सुरक्षा दल (एमएसएफ) आणि गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) जवान सज्ज झाले आहेत. शहरातील रेल्वे स्थानकांवरील रात्रीच्या गर्दीच्या नियोजनासाठी मध्यरात्री विशेष लोकल चालवण्याची मागणी रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

१९ ते २८ सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव आणि अनंत चतुर्दशीसोबतच ईद-ए-मिलाद आहे. या उत्सवकाळातील गर्दी लक्षात घेऊन रेल्वे स्थानकांवर रेल्वे पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या छेडछाडीच्या घटनांना आवर घालण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा यंत्रणांचा सीसीटीव्ही आणि उद्घोषणा यंत्रणांवर भर असणार आहे. रेल्वे पोलिसांनी आरपीएफ, एमएसएफ, होमगार्ड आणि रेल्वे प्रशासनाची नुकतीच बैठक घेतली. बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, दादर, कुर्ला, दिवा, पनवेल, मुंबई सेंट्रल, वांद्रे अशा रेल्वे स्थानक आणि टर्मिनसवर सुरक्षा यंत्रणांच्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्सवात अनुचित प्रकार टाळण्यासाठी बॉम्ब शोधक-नाशक पथक आणि रेल्वे पोलिस, आरपीएफच्या श्वान पथकांकडून गर्दीच्या रेल्वे स्थानकात तपासणी करण्यात येणार आहे.

लई ‘बेस्ट’! सार्वजनिक बाप्पांच्या दर्शनासाठी ‘बेस्ट’ रात्रभर धावणार, मुंबईकरांची सोय झाली
गणेशोत्सवातील तिसऱ्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत दादर, चिंचपोकळी, करी रोड, भायखळा स्थानकात मोठी गर्दी असते. शेवटची लोकल गेल्यानंतर फलाटावर गर्दी वाढते. यामुळे गर्दी विभागण्यासाठी सीएसएमटीहून कल्याण आणि चर्चगेटहून विरार दिशेला मध्यरात्री उशिरा लोकल चालवावी, अशी मागणी रेल्व प्रशासनाकडे करण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महिलांसाठी विशेष खबरदारी

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिस आयुक्तालयातील निर्भया पथक कार्यरत आहे. ‘खाकीतील सखी’ उपक्रमाच्या माध्यमाने महिला प्रवाशांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेण्याचे काम उत्सवकाळात करण्यात येणार आहे. रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल फेऱ्यांमध्ये सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत, असेही रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केले.

सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. महिला डबा, रेल्वे फलाटांवर हुल्लडबाजी करणाऱ्या प्रवाशांविरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. स्थानके तसेच सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन प्रवाशांनी करावे. उत्सव शांततेत, आनंदात साजरा करावा.

डॉ. रवींद्र शिसवे, आयुक्त, मुंबई लोहमार्ग पोलिस

Ganeshotsav 2023: मुंबईत उत्सवरंग…परमानंद, गणरायाच्या स्वागतासाठी भक्त सज्ज; घरोघरी चैतन्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here