सध्या घाऊक बाजारात टॉमेटोच्या ४० ते ४५ गाड्यांची दररोज आवक होत आहे. आवक वाढली असून मुंबई आणि उपनगरांतील टोमॅटोची मागणी पूर्ण करण्यासाठी ही आवक मोठी आहे. परिणामी, बाजारातील टोमॅटोची मागणी पूर्ण होत असल्याने दरवाढीवर नियंत्रण आले आहे. पूर्वी वाढलेल्या किंमती आता आटोक्यात आल्या आहेत. सध्या महाराष्ट्रातून सातारा, पुणे, नाशिकमधून गावठी टोमॅटो बाजारात येत आहेतच, पण त्याचबरोबर बेंगळुरूमधूनही लालबुंद टोमॅटोची चांगली आवक होत आहे. मात्र आवक चांगली असली, तरी हवा तास उठाव नसल्याने भाव खाली जात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
मागील दोन महिन्यांत टोमॅटोचे दर वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या पिकांची लागवड केली होती. त्यामुळे आता आवक वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. मात्र शेतकऱ्याला भाव मिळत नसल्याने, टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे. मागील महिन्यापर्यंत टोमॅटोचे भाव घाऊक बाजारात १०० रुपये किलोपर्यंत स्थिरावले होते. त्यामुळे किरकोळ बाजारात हे भाव १५० रुपयांपर्यंत गेले होते. मात्र आत्ता हे भाव चक्क ७ ते १० रुपयांवर आल्याने शेतकऱ्यांचा वाहतूकखर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. दर कमी झाल्याने ग्राहकवर्ग सुखावला आहे.