मुंबई : गुगल मॅपवर जाऊन हॉटलेला रेटिंग देणे किंवा यूट्युबवरील व्हिडीओंना लाइक करणारे अशा प्रकारचे टास्क देऊन अर्धवेळ कामाचे प्रलोभन दाखवून अनेकांना गंडविणाऱ्या टोळीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. कुलदीप कुमार, विशाल मोहिते, शुभम लोखंडे, आकाश मुजमुले अशी आरोपींची नावे असून त्यांना पुणे आणि अहमदनगर येथून पकडण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून आठ मोबाइल फोन, साडेतीन लाखांची रोख रक्कम तसेच इतर साहित्य हस्तगत केले आहे. या टोळीने फसवणूक केलेली काही रक्कम गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे.धारावीमधील एका तरुणाला टेक्नो फाइव्ह मीडिया इंडस्ट्रीज या कंपनीतून बोलत असल्याचे सांगून एका व्यक्तीने फोन केला. त्याने गुगल मॅपवर जाऊन हॉटेल्सना रेटिंग दिल्यास त्याबदल्यात पैसे मिळतील असे सांगितले. या तरुणाने अर्धवेळ नोकरी म्हणून हे काम स्वीकारले. कामाचे पैसे मिळत असल्याने अधिक मोबदला मिळावा यासाठी त्याने पेड टास्क चा पर्याय निवडला. त्यानुसार थोडे थोडे करून सुमारे ९ लाख ६८ हजार रुपये गुंतविले. प्रत्यक्षात पैसे काढायला गेले असता वॉलेटमधील ही रक्कम काही मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने धारावी पोलिस ठाण्यात तक्रार केली. अर्धवेळ नोकरीच्या नावाखाली फसवणूक वाढल्याने याप्रकरणी गंभीर दखल घेत गुन्हे शाखा युनिट ५ चे प्रभारी पोलिस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या पथकाने समांतर तपास सुरु केला.बँक खात्यावर मिळालेले तपशील, मोबाइल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण याचा अभ्यास केला असता लोणावळा येथून ही फसवणूक करण्यात आल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी लोणावळा गाठले आणि तिथून मिळलेल्या माहितीवरून कमिशनवर बँक खाती पुरविणाऱ्या दोघांना पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी दोघांना अहमदनगर येथून पकडण्यात आले. कुलदीप कुमार, विशाल मोहिते, शुभम लोखंडे, आकाश मुजमुले या चौघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता टास्कच्या माध्यमातून या टोळीने अनेकांना फसविण्यात आल्याचे समोर आले आहे.