ओस्लो: मेटल डिटेक्टरच्या मदतीनं जमिनीत दडलेल्या वस्तू शोधणाऱ्या व्यक्तीचं नशीब फळफळलं आहे. त्याच्या हाती खजिना लागला आहे. दीड हजार वर्षांपूर्वी वापरात असलेलं सोनं सापडल्यानं व्यक्तीचं नशीब पालटलं. जमिनीखाली सापडलेल्या खजिन्यात ९ पेंडंट, ३ अंगठ्या आणि १० पियर्ल्सचा समावेश आहे. घटना नॉर्वेतील आहे. ५१ वर्षीय एरलँड बोरे नावाच्या व्यक्तीला रेनेसोए परिसरात घबाड सापडलं. एरलँड आजारी होते. एका जागी पडून राहण्यापेक्षा शरीराची हालचाल करण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला. त्यामुळे ते फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते.डॉक्टरांचा सल्ला एरलँड यांनी मनावर घेतला. फेरफटका मारायला जाण्याआधी त्यांनी एक मेटल डिटेक्टर खरेदी केला. फेरफटका मारण्यास गेलेल्या एरलँड यांचं नशीब फळफळलं आहे. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं सापडणं असामान्य असल्याचं स्टवान्गर विद्यापीठाच्या पुरातत्त्व संग्रहालयाचे संचालक ओले मॅडेसन यांनी सांगितलं. एरलँड यांनी ऑगस्टपासून फेरफटका मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी ते पर्वतीय भागांमध्ये फिरायला गेले. आधी त्यांना कचरा सापडला. पण नंतर त्यांच्या हाती काहीतरी अजब वस्तू लागली. तिचं वजन १०० ग्रॅमपेक्षा अधिक होतं. बोरे यांना सापडलेलं सोनं १५०० वर्षे जुनं आहे.नॉर्वेतील कायद्यानुसार, १५३७ सालच्या आधीच्या वस्तू आणि १६५० पेक्षा जुन्या नाण्यांना सरकारी संपत्ती मानलं जातं. या वस्तू सरकारच्या ताब्यात द्याव्या लागतात. ‘एरलँड बोरे यांना सापडलेल्या दागिन्यांपैकी एक दागिना सुवर्ण पदकासारखा आहे. त्याच्या एका बाजूलाच सोनं आहे. युरोपातील प्रवाशांनी जेव्हा एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यास सुरुवात केली, त्याचवेळी हे सामान इथे राहिलं. त्यांची निर्मिती कुशल कारागिरांनी केली आहे. समाजातील प्रतिष्ठित लोक हे दागिने परिधान करायचे. अशा प्रकारच्या वस्तू १९ व्या शतकानंतर सापडलेल्या नाहीत,’ अशी माहिती असोसिएट प्रोफेसर हाकोन रियरसन यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here