नागपूर: महापालिका आयुक्तपदावरून बदली करण्यात आलेले धडाकेबाज सनदी अधिकारी आज नागपूरहून मुंबईकडे रवाना झाले. त्यांना निरोप देण्यासाठी नागपूरमधील चाहत्यांनी त्यांच्या घराबाहेर तुफान गर्दी केली होती. यावेळी मुंढे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. ‘वुई वॉण्ट मुंढे साहेब… आगे आगे मुंढे, पीछे पड गये गुंडे… वंदे मातरम्…’ अशा घोषणा लोक देत होते.

वाचा:

मुंढे हे तब्बल सात महिने महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळं नागपूरकरांची मने जिंकली होती. अलीकडेच त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर नियुक्ती झाली होती. अवघ्या १५ दिवसांत ती बदलीही रद्द झाली आहे. त्यांना कोणती नवी जबाबदारी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, नागपूरमधून त्यांनी आपला मुक्काम हलवला आहे. करोनाची लागण झालेल्या मुंढे हे नुकतेच या आजारातून बरे झाले आहेत. आज ते मुंबईकडे रवाना झाले. तत्पूर्वी, फेसबुक पोस्ट शेअर करून त्यांनी नागपूरकरांचे सहकार्याबद्दल आभार मानले. नागपूरकरांनी शासन, प्रशासनाला यापुढंही सहकार्य करावं. नागपूरकरांशी असलेले ऋणानुबंध कायम राहतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसंच, नागपुरातून निघण्यापूर्वी मुंढे यांनी काही नागरिकांच्या भेटीही घेतल्या.

मुंढे यांना निरोप देण्यासाठी अनेक लोकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली होती. तुकाराम मुंढे यांना पाठिंबा देणारे पोस्टर त्यांच्या हातात होते. ‘वुई वॉण्ट मुंढे साहेब, आगे आगे मुंढे, पीछे पड गये गुंडे, वंदे मातरम्, मी सुद्धा तुकाराम’ असं लोक म्हणत होते. तसंच, मुंढे यांच्या बदलीसाठी आग्रही असलेल्या राजकारण्यांनाही लोकांनी लक्ष्य केले. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या विरोधात ‘मुर्दाबाद, मुर्दाबाद’ अशा घोषणाही लोकांनी दिल्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here