म. टा. प्रतिनिधी, : अक्षय डाकी या तरुणाच्या अपहरणानंतर झालेल्या हत्येचा कासारवडवली पोलिसांनी उलगडा करून त्याच्या मित्रासह तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अक्षयच्या गळ्यातील चार तोळ्यांच्या सोन्याच्या साखळीसाठी मित्रानेच कट रचून अन्य दोघांच्या मदतीने ही हत्या केली आणि मृतदेह खाडीत फेकून दिल्याची बाब समोर आली आहे.

घोडबंदर रोडवरील वाघबीळ गावात राहणारा अक्षय हा अचानक बेपत्ता झाला होता. मुलगा हरवल्याची वडिलांनी कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अक्षयचा शोध सुरू केला. ओवळा, पानखंडा, वाघबीळ, कासारवडवली गावांत शोध घेऊनही अक्षय सापडला नाही. मित्र आणि नातेवाईकांकडेही चौकशी केली. मात्र, काहीच माहिती न मिळाल्याने अक्षयचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली. चौकशीत अक्षय त्याचा मित्र धनराज तरुडे याला भेटण्यासाठी पानखंडा गावात जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच अक्षयची मोटारसायकल पानखंडा परिसरात सापडली. त्यामुळे पोलिसांचा धनराजवर संशय अधिक बळावला. त्याच्या चौकशीदरम्यान अक्षयच्या हत्येचा उलगडा झाला.

अक्षय याच्या गळ्यातील चार तोळ्याची सोन्याची साखळी मिळवण्यासाठी त्याच्या हत्येचा कट धनराजने रचला. जवळचा नातेवाईक कृष्णा घोडके आणि मित्र चंदन पासवान यांच्याशी संगनमत करून त्यांनी अक्षयला मारहाण केली आणि दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली, अशी कबुली धनराज याने दिली. त्यांनी वसईतील मालजीपाडा खाडीत अक्षयचा मृतदेह फेकून दिला होता. अग्निशमन दल आणि स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी खाडीतून मृतदेह शोधून काढला. धनरासह कृष्णा आणि चंदन या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. धनराजकडून सोन्याची साखळी, मोबाइल फोन आणि इतर साहित्य जप्त केले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने या गुन्ह्याची उकल केली.

गोणीत मेलेले कुत्रे असल्याचा बनाव

मृतदेह रिक्षातून वसईला घेऊन जाण्यासाठी धनराजने एका रिक्षाचालकाला ४ सप्टेंबरच्या पहाटे ५ वाजता तयार राहण्याविषयी सांगितले होते. त्यानुसार हा रिक्षाचालक आला. काही अंतरावर गेल्यानंतर त्याने झुडपातून एक गोणी आणून रिक्षात ठेवली. अक्षयचा मृतदेह असलेली ही गोणी धनराजने खाडीत फेकून दिली. यावेळी रिक्षाचालकाने गोणीत काय आहे, अशी विचारणा केली असता मेलेले कुत्रे असल्याचे धनराजने रिक्षाचालकाला सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here