म. टा. प्रतिनिधी, नाशिक : केमिकलसह बुटांची वाहतूक करत असलेल्या टेम्पोचालकाला रात्री रस्त्यालगत विश्रांती घेणे चांगलेच महागात पडले आहे. चालक झोपेत असताना टेम्पोत असलेले पावणेनऊ लाख रुपयांचे ‘ब्रँडेड शूज’ चोरट्यांनी लंपास केले. मुंबई-आग्रा महामार्गावरील गौळाणे परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील रेतीबंदरमध्ये राहणारे राधेश्याम मकरंद सिंग यांनी अंबड पोलिसांत फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. १८) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांनी टेम्पो गौळाणे परिसरातील पेट्रोलपंपाजवळ उभा केला. त्यानंतर टेम्पोमध्येच त्यांनी विश्रांती घेतली. काही वेळाने त्यांना जाग आल्यावर टेम्पोतील ८ लाख ६४ हजारांचे ‘ब्रँडेड शूज’ चोरी झाल्याचे लक्षात आले. बुटांचा माल कोणीतरी पळविल्याने त्यांनी अंबड पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. याप्रकरणी उपनिरीक्षक संदीप पवार पुढील तपास करीत आहेत.नेमकं काय घडलं?राधेश्याम सिंग हे इंदूरहून नाशिकमार्गे मुंबईकडे जात होते. त्यांच्या टेम्पोमध्ये अतिज्वलनशील केमिकलचा साठा होता. नियमानुसार रात्री केमिकलची वाहतूक करता येत नाही. त्यामुळे रात्री दहानंतर त्यांनी प्रवास थांबविला. पहाटेपर्यंत विश्रांतीसाठी त्यांनी गौळाणेजवळील पेट्रोलपंपासमोर टेम्पो उभा केला. टेम्पोत महागड्या बुटांचाही साठा होता. मात्र, मागची बाजू खुली असल्याने सिंग झोपेत असताना चोरट्यांनी महागड्या बुटांचा साठा पळविला. चोरट्यांनी केमिकलच्या साठ्याला स्पर्शही केला नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here