याप्रकरणी वरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम (वय ४०, रा. राजकिसन कॉलनी, ता. शक्तीनगर, जि. सोनभद्र, उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून जितेंद्र गंगाराम हेमब्रम (रा. राजकिसन कॉलनी, ता. शक्तीनगर, जि. सोनभद्र, उत्तरप्रदेश) असे संशयित पतीचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, मूळचा उत्तर प्रदेशातील जितेंद्र गंगाराम हेमब्रम हा त्याच्या पत्नी शांतीदेवी सोबत भुसावळ तालुक्यातील हतनूर गावात राहत होता. या गावानजीक असलेल्या हतनूर धरणाच्या वाढीव दरवाजाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. याच ठिकाणी जितेंद्र हेमब्रम व शांतीदेवी हे दाम्पत्यदेखील मजुरीचे काम करुन उदरनिर्वाह भागवते. रविवारी दुपारी जितेंद्र हेमब्रम याने स्वतः पिण्यासाठी आणलेली दारू पत्नी व शेजारी असलेल्या करणी शिवराम यादव या दोघांनी पिल्याने जितेंद्र हेमब्रम याला राग आला. संतापातून जितेंद्र हेमब्रम याने पत्नी शांतीदेवीला कमरेच्या पट्ट्याने जबर मारहाण केली. यानंतर दारूच्या नशेत तिचा गळा दाबला त्यामुळे शांतीदेवीचा मृत्यू झाला.
पत्नी शांतीदेवी हिचा खून झाल्याने या खूनाचे पितळ उघडे पडू नये म्हणून जितेंद्र हा याने सायंकाळी साप चावल्याचे कारण डॉक्टरांना सांगून शांतीदेवी हिला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानुसार सुरुवातीला वरगणाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले, वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश उगले यांना मयत महिलेच्या अंगावर साप चावल्याचे कोणत्याही खुणा दिसत नसल्याचे सांगितल्याने पोलिसांच्या मनाच संशयाची पाल चुकचुकली. त्यानुसार सोमवारी सकाळी मयत शांतीदेवी हिचे शवविच्छेदन करण्यात आले.
शवविच्छेदनात शांतीदेवी हिचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यानुसार याप्रकरणी पोलिसांनी सरकारपक्षातर्फे फिर्याद दिली, पोलीस हवालदार नावेद अली यांच्या फिर्यादीवरून संशयित जितेंद्र गंगाराम हेमब्रमवर वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात असून जितेंद्र हेमब्रम याा अटक करण्यात आली आहे, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ हे तपास करीत आहेत.