पुणे : पुणे-सोलापूर रेल्वे लाइनवरील घोरपडी परिसरातील थोपटे चौकालगत सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, केवळ रेल्वे ट्रॅकवर पुलाचा सांगडा उभारणे बाकी आहे. ठेकेदार कंपनीकडून हा सांगडाही तयार करण्यात आला असून, त्यास रेल्वेची मान्यता मिळत नसल्याने, या पुलाचे काम रखडले आहे. महापालिका प्रशासनाने रेल्वेला याबाबत विनंती केल्यानंतरही त्याची फारशी दखल घेतली गेलेली नाही.

घोरपडी परिसरातून रेल्वेचे दोन ट्रॅक जातात. एक ट्रॅक हा पुणे-मिरज आणि दुसरा ट्रॅक हा पुणे-सोलापूर असा आहे. या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यासाठी महापालिकेचे २०१६पासून प्रयत्न सुरू आहेत. घोरपडी परिसरातील थोपटे चौकालगत पुणे-सोलापूर रेल्वे लाइनवर क्रॉसिंग असून, तेथे उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मुंढवा, खराडी, कल्याणीनगर हा पूर्वेकडील भाग मध्यवर्ती पुण्याशी घोरपडी गावातील अरुंद रस्त्याने जोडला गेला आहे. पुणे-सोलापूर या रेल्वे लाइनवर रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने, वारंवार रेल्वे गेट बंद करण्यात येते. घोरपडी गावातील रस्ता अरुंद असून, रस्त्याचा दुर्तफा दुकाने असून, स्थानिकांना रहदारीसाठी एकमेव रस्ता आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.

लोखंडी सांगाडा तयार:

महापालिका प्रशासनाने थोपटे चौकालगतच्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू केले आहे. रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी सिमेंट क्राँक्रिटद्वारे उड्डाणपुलाची उभारणी केली आहे. रेल्वे ट्रॅकवर लोखंडी सांगाडा उभारून त्यावरून वाहतूक ये-जा करणार आहे. हा सांगडा बनविण्यासाठी रेल्वेने नियुक्त केलेली कंपनी असून ती सासवड येथे आहे. हा सांगाडा कसा असावा, यासाठी आवश्यक असलेली सल्लागार कंपनीही रेल्वेने नियुक्त केलेली आहे. महापालिका प्रशासनाने त्यानुसार हा सांगडा सासवड येथील कंपनीकडून तयार केला आहे. त्या सांगाड्याची रेल्वे प्रशासनाकडून तेथे जाऊन तपासणी केली जाते. त्यानंतर तो सांगाडा पूर्णपणे खोलण्यात येईल आणि तो घोरपडी येथे आणून उभारण्यात येईल. त्यानंतर रेल्वेची पुन्हा तपासणी होईल आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्यावरून वाहतूक सुरू करण्यात येईल, असे नियोजन आहे.

एक ऑक्टोबरनंतर डांबरीकरण:

महापालिका प्रशासनाने गेल्या महिन्यातही रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून सोलापूर येथे तयार झालेल्या सांगाड्याची तपासणी करण्याची विनंती केली आहे. या सांगाड्याची तपासणी झाल्यानंतरच पुढील काम सुरू करण्यात येणार आहे. त्यापूर्वी उड्डाणपुलाची राहिलेली किरकोळ कामे करण्यात येत आहेत. उड्डाणपुलाच्या अनुषंगाने आवश्यक असलेले रस्त्यांचे डांबरीकरण एक ऑक्टोबरनंतर सुरू करण्यात येणार आहे.

झुरळांच्या सुळसुळाटामुळे प्रवासी हैराण, पनवेल-नांदेड रेल्वे पुणे स्थानकावर थांबवली

वीस दिवस, दररोज दीड तास:

घोरपडी येथील उड्डाणपुलासाठी आवश्यक लोखंडी सांगाड्यास परवानगी मिळाल्यानंतर तो उभारण्यासाठी किमान २० दिवस लागणार आहे. या ठिकाणी काम करण्यासाठी प्रतिदिन दीड तासांचा रेल्वेचा ब्लॉक घ्यावा लागणार आहे. या दीड तासातच काम करावे लागणार आहे. त्यामुळे अत्यंत चिवट असलेले हे काम वेळेत पूर्ण करून डिसेंबरपर्यंत हा उड्डाणपूल सुरू करण्याचे महापालिका प्रशासनासमोर आव्हान आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने या सांगाड्याची तपासणी करण्याची विनंती केली आहे.

घोरपडी येथील पुणे-सोलापूर रेल्वे लाइनवरील उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित २० टक्के काम तातडीने पूर्ण करण्यासाठी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली आहे. वर्षअखेरीपर्यंत हा उड्डाणपूल खुला करण्यात येईल.

– सुनील कांबळे, आमदार, कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघ

रेल्वे उड्डाणपुलाचा खर्च : ४८ कोटी रुपये:

रेल्वे पुलाची लांबी : ४९३ मीटर

रेल्वे पुलाची रुंदी : मुंढवा रस्त्याकडे : १०.५ मीटर, बी. टी. कवडे रस्त्याकडे : ६.५ मीटर

पोहोच रस्त्यांची लांबी : एक किलोमीटर

सेवा रस्त्यांची लांबी : दीड किलोमीटर

Pune News: पुणेकरांची गैरसोय होणार, ‘या’ भागात वाहतुकीला बंदी, अनेक रस्ते बंद; पण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here