झारखंडची राजधानी रांचीतील धुर्वा परिसरात असलेल्या जुन्या विधानसभेसमोर दीपक यांचं लहानसं दुकान आहे. गेल्या काही दिवसांपासून ते इथे इडली विकतात. सकाळी इडली विकून दुपारी कामाला जातात. संध्याकाळी पुन्हा इडली विकून घरी परततात. २०१२ मध्ये दीपक एका खासगी कंपनीत काम करायचे. त्यांना महिन्याला २५ हजार रुपये पगार मिळायचा. एचईसीमध्ये ते केवळ ८ हजार रुपयांच्या पगारावर रुजू झाले. सरकारी नोकरी असल्यानं त्यांनी एचईसीची नोकरी स्वीकारली.
‘पगार मिळाला नाही म्हणून सुरुवातीला क्रेडिट कार्डनं घर चालवलं. पण दोन लाखांचं कर्ज झालं. मला दिवाळखोर घोषित करण्यात आलं. त्यानंतर नातेवाईकांकडून पैसे उधार घेतले. आता डोक्यावर ४ लाखांचं कर्ज आहे. अनेकांनी उधारी बंद केली. पत्नीचे दागिने गहाण ठेवले आहेत. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मी इडलीचं दुकान सुरू केलं. दिवसाला ३०० ते ४०० रुपयांची इडली विकतो. त्यातून कधी ५० तर १०० रुपये सुटतात. याच पैशातून सध्या घर चालतंय,’ अशी व्यथा दीपक यांनी मांडली.
२००३ ते २०१० या कालावधीत एचईसीनं इस्रोला मोबाईल लॉन्चिंग पॅड पेडस्टल, हॅमर हेड टॉवर क्रेन, ईओटी क्रेन, फोल्डिंग कम वर्टिकल रिपोजिशनेबल प्लॅटफॉर्म, हॉरिझाँटल स्लायडिंग डोर्सचा पुरवठा केला. पण चांद्रयान-३ मोहिमेतील कोणतंही उपकरण तयार करण्यात एचईसीनं मदत न केल्याचा सरकारचा दावा आहे. यावर एचईसीचे व्यवस्थापक पुरेंदू दत्त यांनी प्रतिक्रिया दिली. तांत्रिकदृष्ट्या केंद्र सरकारची बाजू खरीही असेल. कारण चांद्रयान-३ साठी कोणताही वेगळा लॉन्चपॅड तयार करण्यात आलेलं नव्हतं. पण भारतात एचईसीशिवाय कोणतीही कंपनी लॉन्चपॅड तयार करत नाही.