पुणे : पुणेकरांना आता देशी गायीच्या दुधापासून बनवलेले इन्स्टंट आइस्क्रीम खाण्याची सुविधा कृषी महाविद्यालयात उपलब्ध झाली आहे. बनाना, पेरू, द्राक्ष अशा विविध ‘फ्लेव्हर्स’मध्ये नाममात्र शुल्कात मस्तपैकी आइस्क्रीमची चव चाखता येणार आहे. आगामी काळात या दुधापासून सॉफ्टीही तयार करण्यात येणार आहे. कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ‘स्टार्टअप’अंतर्गत विविध यशस्वी प्रकल्प राबवावेत, या उद्देशाने उपक्रम सुरू केला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये आंत्रप्रेन्युअरशिप विकसित करण्यासाठी देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हा नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात आला आहे. त्या अंतर्गत देशी गायीच्या दुधापासून इन्स्टंट आइस्क्रीम तयार करण्यात येऊन, त्याची विक्री सुरू झाली आहे. अशा प्रकारचे इन्स्टंट आइस्क्रीम हे पहिल्यांदाच पुण्यात मिळत असल्याचे कृषी महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले. सध्या बाजारपेठेत उपलब्ध असणारे इन्स्टंट आइस्क्रीम व्हेजिटेबल ऑइल आणि फ्रोझन पदार्थापासून तयार केले जाते. मात्र, कृषी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील विक्री केंद्रातून मिळणारे इन्स्टंट आइस्क्रीम हे शैक्षणिक संकुलातील देशी गायीच्या ताज्या दुधापासून तयार केले जात आहे.

नगरचा पोरगा पुण्यात आला, मेसच्या जेवणानं वैतागला; हजारो सुगरणींसह पठ्ठ्यानं नवा स्टार्टअप उभा केला

पेरू, बनाना, द्राक्ष, चिकू अशा फ्लेवर्ससाठी संकुलातील फळांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे या आइस्क्रीमची चव इतर आइस्क्रीमच्या तुलनेत अधिक चांगली आणि चविष्ट जाणवते. ओरिओ डीलाइट, चोको किटकॅट असेही फ्लेवर उपलब्ध आहेत. केवळ ३५ रुपयांत आइस्क्रीमचे चार रोल ग्राहकांना देण्यात येत आहेत. या इन्स्टंट आइस्क्रीमच्या विक्रीला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील मासाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. या विक्री केंद्रातून शुद्ध दूध, दही, पनीर, लस्सी, बासुंदी, श्रीखंड अशा दुग्धजन्य पदार्थांची सकाळी दहा ते पाच या वेळेत विक्री होते, असे महाविद्यालयाने सांगितले.

कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलता विकसित होण्यासाठी नावीन्यपूर्ण स्टार्टअप प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत इन्स्टंट आइस्क्रीम विक्री सुरू केली आहे. आगामी काळात सॉफ्टीही मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे विद्यार्थ्यांकडून चालविण्यात येत असल्याने, सर्व आर्थिक व्यवहार विद्यार्थी पाहतात.

– डॉ. धीरज कणखरे, प्रमुख, पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग

देशात देशी गायीच्या एकूण ५३ जाती आहेत. त्यातील सहिवाल, गीर, राठी, रेड शिंदी, थार पार्कर अशा पाच जातींच्या गायींचे ब्रीड देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात आहे. या ब्रीडवर संशोधन करण्यासह दुधापासून पनीर, तूप, दही, लस्सी, ताक, आइस्क्रीम तयार करण्यात येत आहे. हे पदार्थ संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात येत असल्याने शुद्ध आणि दर्जेदार आहेत.

– डॉ. सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र

ॐ नमस्ते गणपतये… दगडूशेठ बाप्पांसमोर ३६ हजार महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here