लोकसभेत आज अमित शाह म्हणाले होते ककी महिलांच्या भल्यासाठी केवळ महिलांनीच बोलावं असं नाही, पुरुषही बोलू शकतातच आम्ही भाऊ म्हणून बोलू शकतो याचा संदर्भ देत सुप्रिया सुळेंनी पुढील टोला लगावला. “प्रत्येक घरात असे भाऊ असतातच असे नाही की जे बहिणीचं कल्याण बघतील. प्रत्येकाचं नशीब एवढं चांगलं नसतं”, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. महात्मा फुले यांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला. महिला धोरणाची सुरुवात राजीव गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसनं केली. माझे वडील शरद पवार यांनी ३३ टक्के महिला आरक्षण पंचायत राजमध्ये लागू ते महाराष्ट्र राज्य होतं, याचा अभिमान वाटतो असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
भाजपच्या एकेकाळी प्रदेशाध्यक्ष असलेल्या नेत्यानं मला ऑन कॅमेऱ्यावर घरी जाऊन जेवण बनवण्यास सांगितलं. ही भाजपची प्रवृत्ती आहे. दुसऱ्या एका मंत्र्यानं माझ्याबद्दल ऑन कॅमेरा अपशब्द वापरले. त्यामुळं भाजपनं उत्तर दिली पाहिजेत. तुमचे मंत्री वैयक्तिक टिप्पणी लोकांमधून निवडून आलेल्या महिलेबद्दल बोलतात. मी त्याच्यावर प्रतिक्रिया देखील दिली नव्हती, ती द्यायची देखील गरज नव्हती, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
राज्यसभा आणि विधानपरिषदेत आरक्षण का नाही?
जनगणना आणि मतदारसंघ फेररचना झाल्यानंतर हे आरक्षण लागू होणार आहे तर संसदेच्या विशेष अधिवेशनाची गडबड का करण्यात आली. या दोन्ही गोष्टी कधी होतील माहिती नाही तर आरक्षण कधी लागू होणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. महात्मा गांधी यांनी क्रिप्स मिशनसाठी वापरलेल्या शब्दांचा दाखला दिला. महात्मा गांधी क्रिप्स मिशनबद्दल म्हणाले होते की तो बुडत्या बँकेचा पुढच्या तारखेचा चेक आहे. तुमच्याकडे ३०३ खासदार आहेत तर राज्यसभा आणि विधानपरिषदेत आरक्षण का देत नाही असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी केला. एससी, एसटी आणि ओबीसी महिलांसाठी आरक्षण देखील द्यावं, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.