रायगढ: ऍक्सिस बँकेत फिल्मी स्टाईलमध्ये दरोडा टाकण्यात आला. सात जणांनी सशस्त्र दरोडा टाकून बँकेतून ५ कोटी ६३ लाख रुपये लुटले. व्यवस्थापकासह अन्य कर्मचाऱ्यांना एका खोलीत बंद करुन आरोपींनी दरोडा टाकला. या दरम्यान लुटारुंनी बँकेच्या व्यवस्थापकाला चाकूनं भोसकलं. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोट्यवधींचा दरोडा पडल्याची माहिती मिळताच डीआयजी, एसपींसह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. छत्तीसगढच्या रायगढ जिल्ह्यात सकाळी ९ ते १० च्या दरम्यान ही घटना घडली.रायगढ शहरातील घरघोडा मार्गावर असलेल्या ऍक्सिस बँकेच्या शाखेत सकाळी पावणे नऊच्या सुमारास एक-एक करुन ७ जण आले. दुचाकीवरून आलेल्या लुटारुंचे चेहरे झाकलेले होते. त्यांनी धारदार शस्त्रांच्या आधारे आधी बँक कर्मचाऱ्यांना ओलिस ठेवलं. त्यानंतर व्यवस्थापकाला बंदुकीचा धाक दाखवला आणि त्याच्याकडून स्ट्राँग रुमची चावी घेतली. तिथे असलेले कोट्यवधी रुपये आणि दागिने लुटारुंनी ताब्यात घेतले. बँकेतून लुटलेले पैसे आणि दागिने एका बॅगेत टाकून ते बाहेर पडले. त्यानंतर वेगवेगळ्या मार्गांनी निघून गेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.पोलीस अधीक्षक सदानंद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० च्या सुमारास बँक कर्मचाऱ्यांनी दरोड्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथक बँकेत पोहोचलं. पोलिसांची पथकं लुटारुंचा शोध घेत आहेत. बँकेतून किती रक्कम चोरीला गेली त्याचा तपास सुरू आहे. लुटारुंची संख्या सात होती. त्यातील अनेकांकडे हत्यारं होती. सीसीटीव्हींच्या आधारे त्यांचा शोध सुरू आहे. त्यांना पकडण्यासाठी अनेक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे.लुटारुंनी फिल्मी स्टाईलनं बँकेवर दरोडा टाकला. हेल्मेट घालून ते बँकेच्या बाहेर पोहोचले. एका पाठोपाठ आत शिरले. त्यांनी सर्वात आधी बँक व्यवस्थापकाला ओलिस ठेवलं. त्याला चाकूनं भोसकलं. त्यानंतर बँकेतील कोट्यवधींची रोकड आणि दागिने घेऊन पोबारा केला. या दरोड्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here