म. टा. प्रतिनिधी । सांगली

कृषी राज्यमंत्री यांना करोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी सकाळी स्पष्ट झाले. ताप आणि अंगदुखीची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी गुरुवारी स्वॅब तपासणीसाठी दिला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. कदम यांना त्यांच्या पुण्यातील घरात क्वारंटाइन झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती देऊन संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी कदम यांच्या कुटुंबातील आमदार मोहनराव कदम यांच्यासह चौघांना करोनाची लागण झाली होती.

सांगली जिल्ह्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून लोकप्रतिनिधीही याचा सामना करीत आहेत. आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, सदाभाऊ खोत, विक्रम सावंत, सुमन पाटील, अनिल बाबर यांच्यानंतर आता कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनाही करोनाची लागण झाली आहे. याबाबत विश्वजित कदम यांनी लिहिलेल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हंटले आहे की, ‘माझा पलूस-कडेगाव मतदारसंघ, सांगली जिल्हा, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा पाठपुरावा, संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना, मंत्रालयातील बैठका, भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने पूरपरिस्थितीचे पाहणी दौरे, भारती विद्यापीठ कामकाज अशा धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु, अखेर मला करोना संसर्ग झालाच! थोडा ताप आणि अंगदुखी अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करून घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी करोना पॉझिटिव्ह झालो आहे.’

‘गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी बाळगवी. माझ्या तब्येतीला कोणताही धोका नाही. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घरीच विलगीकरणात मी उपचार घेत आहे. माझे कार्यालय नियमित सुरू असून, मीदेखील फोनच्या माध्यमातून उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करेन. करोना संसर्गातून पूर्ण बरा होत लवकरच आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन.’
दरम्यान, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सांगली जिल्ह्यात शुक्रवारपासून दहा दिवसांसाठी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांनी नेहमीप्रमाणे दैनंदिन व्यवहार सुरू ठेवल्याने जनता कर्फ्यूचा फज्जा उडाला आहे. बाजारपेठांमध्ये केवळ १५ ते २० टक्के दुकाने बंद आहेत. बहुतांश बाजारपेठा सुरूच असल्याने रस्त्यांवर गर्दी कायम आहे. यातच रोज करोेनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here