अहमदनगर : ‘ बाधितांची संख्या वाढतेय, हा काळजी वाटणाराच विषय आहे. त्यात दुमत काहीच नाही. त्यामुळे याबाबत लोकांमध्ये प्रबोधन करून त्यांना शिक्षित करणे व सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी जे मास्क वापरत नसतील, सोशल डिस्टन्सिंग पाळत नसतील, त्यांना कुठेतरी दंड लावावच लागेल. तशी परिस्थिती निर्माण झाली आहे,’ असे आरोग्यमंत्री यांनी स्पष्ट केले. ते नगरमध्ये बोलत होते. लॉकडाऊनवरही टोपे यांनी आपले स्पष्ट मत मांडले.

महाराष्ट्रातील करोना बाधितांचा आकडा हा आज दहा लाखांच्या पुढे गेला आहे. त्याबाबत टोपे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘करोनाची संख्या ही दहा लाखांच्या पुढे गेली असली तरी त्यामध्ये साडेसात लाख हे लोक बरे होऊन घरी गेले आहेत. दहा लाखांचा आकडा हा लक्षात ठेवण्यापेक्षा अॅक्टिव्ह पेशंट किती आहेत, हे लक्षात घ्यावे. या अॅक्टिव्ह पेशंटमधील गंभीर हे तीन ते चार टक्के असतात. परंतु संख्या वाढतेय, हा काळजी वाटणाराच विषय आहे. त्यात दुमत काही नाही. यासाठी प्रबोधन करून लोकांना चांगले शिक्षित करणे व सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे बंधनकारक केले पाहिजे. तसेच महाराष्ट्रभरात सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्यांना, सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांना कुठेतरी दंड लावावच लागेल. तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण जोपर्यंत लस निर्माण होत नाही, तोपर्यंत करोनासोबत जगायचे आहे. त्यादृष्टीकोनातून या गोष्टी महत्त्वाच्या आहेत,’ असेही टोपे यांनी सांगितले.

‘आज ज्या पेशंटला बेड पाहिजे, ऑक्सिजन हवा आहे, आयसीयु हवा आहे, त्यांना तो मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणे, यावर आमचा भर आहे,’ असे सांगून टोपे पुढे म्हणाले, ‘मृत्यूदर कमी झाला पाहिजे यासाठी ज्या उपचाराच्या अनुषंगाने उत्कृष्ट उपाययोजना करता येतील, त्या आम्ही करत आहोत. जनतेने देखील सर्व कामात चांगल्या पद्धतीने सहकार्य करावे,’ असे आवाहन देखील त्यांनी केली.

जनता कर्फ्यूचा फायदा होतो

करोनामुळे काही शहरांमध्ये, तालुक्यात जनता कर्फ्यू पुकारला जात आहे. याबाबत टोपे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘एखाद्या जिल्ह्यातील बेडची क्षमता संपत आली व ही क्षमता वाढवायची असेल, तर अशा वेळी जनता कर्फ्यू करण्याचा फायदा होतो. जनता कर्फ्यूमुळे लोक घरात थांबल्याने संक्रमण थांबते, दुसरा फायदा म्हणजे बंदच्या काळात आरोग्य सुविधा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कालावधी मिळतो. त्यामुळे जेथे जेथे स्थानिक प्रशासन, तेथील पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांना वाटत असेल, त्याठिकाणी ते छोट्या कालावधीचा जनता कर्फ्यु करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर विचार करतात. परंतु संपूर्ण करणे हा आता विषय राहिला नाही. आपण आता करण्याचे कामच टप्प्याटप्याने करीत आहोत.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here