सोलापुरात जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातील सहा सदस्यांवर भाजपला मतदान केल्याने निलंबनाची कारवाई केली. पण या निलंबनानंतर मोहिते पाटील गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ‘आधी अजित पवारांवर कारवाई करा, मगच आमच्या सदस्यांचं निलंबन करा’, असं म्हणत जयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
‘राज्याच्या सत्ताकारणात पक्षविरोधी भूमिका घेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली? अडीच वर्षांपूर्वी संजय शिंदे भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्ष झाले त्यावेळी कोणती कारवाई केली? यासोबतच दिपक साळुंखे यांचा पराभव करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सदस्यांवर कारवाई झाली का?’ असे सवाल जयसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केले आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जयसिंह मोहिते पाटील यांच्या गटातील सहा सदस्यांनी भाजपला मतदान केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. स्वरुपाराणी मोहिते पाटील, शितल देवी मोहिते-पाटील, सुनंदा फुले, अरुण तोडकर, गणेश पाटील आणि मंगल वाघमोडे अशी कारवाई करण्यात आलेल्या सदस्यांची नावे आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times