पाटणाः बिहारमधील विधानसभा निवडणुकीची धग आता महाराष्ट्रातही जाणवू लागली आहे. मुंबईत नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या मुद्द्यावरून बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे नेते महाराष्ट्रातील आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. माजी अधिकाऱ्याला कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण निषेधार्ह आहे. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या मारहाणीच्या या घटनांमुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी चिराग पासवान यांनी केली आहे. ६२ वर्षाच्या माजी नौदल अधिकाऱ्याला मुंबईत शुक्रवारी शिवसेनेच्या ८ ते १० कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचे मृत्यू प्रकरण, नंतर अभिनेत्री कंगना राणावतविरोधात तिच्या ऑफिसवर मुंबई महापालिकेने सूडातून केलेली तोडफोडीची कारवाई आणि आता माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण महाराष्ट्रात चालंय काय? महाराष्ट्र सरकार करतंय का? महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून नागरिकांना मारहाण होत आहे. महाराष्ट्रातील जनतेत अशा घटनांमुळे भीतीचं वातावरण आहे. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावं, अशी मागणी चिराग पासवान यांनी केलीय.

महाराष्ट्रात रहात असलेल्या बिहारी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. महाराष्ट्रची जडणघडण ही फक्त कुणी एकाने केलेली नाही. तर कंगनासारख्या कलाकारांचेही त्यात योगदान आहे. पण अशाच प्रकारचे नागरिकांवर हल्ले होत राहिले आणि सूड घेतला जात असेल तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, अशी मागणी चिराग पासवान यांनी केली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार होते. त्यांनी आपल्या व्यंगचित्रांमधून समाजातील वास्तव जनतेसमोर मांडले. आपले परखड विचार व्यक्त केले. पण शिवसेना कार्यकर्त्यांच्या आणि पक्षाच्या सध्याच्या कृत्यांमधून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्यात आली आहे, असा हल्लाबोलही पासवान यांनी केलाय.

महाराष्ट्रात बिहारी नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात बिहार सरकारसह प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे. देश हा सर्वांचा आहे आणि नागरिकांना देशात कुठेही राहण्याचा अधिकार आहे, असं चिराग पासवान म्हणाले.

कंगना राणावत काय निवडणूक लढवतेय का? ती स्पष्ट बोलली म्हणून तिच्यावर सूडातून कारवाई केली गेली. ही लढाई बिहारच्या सुपुत्रासाठी आहे. सुशांतसिंह प्रकरणात महाराष्ट्रात सरकार प्रश्नांपासून का दूर पळतंय? असा सवाल चिराग पासवान यांनी केला.

नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांनी व्हॉट्सअॅपवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कार्टून फॉरवर्ड केले. यावरून शिवसेना कार्यकर्त्यांनी आपल्याला धमकी दिली आणि आपल्या वडिलांना मारहाण केली, असं अधिकाऱ्याची मुलली शिला शर्माने सांगितलं. तर कांदिवलीत शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा मारहाणीचा प्रकार घडला. या प्रकरणातील संबंधित कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. पण या कार्यकर्त्यांची जामिनावर नंतर सुटका करण्यात आली.

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्टून फॉरवर्ड केले. यानंत शिवसेनेचे काही कार्यकर्ते त्यांच्या घरी गेले आणि घराबाहेर खेचून मारहाण त्यांना केली. या मारहाणीत शर्मा यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांना जामिनावर सोडले आहे. यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी महाराष्ट्रा सरकारवर टीका केली आहे. तसंच संबंधित शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन कडक कलमांतर्गत गुन्हा नोदवावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here