कोलकात्यातून अटक करण्यात आलेला आरोपी हा जिम प्रशिक्षक आहे. पलाश बोस (वय ४९ ) असं त्याचं नाव आहे. कोलकात्यातील टोलीगंज भागात राहणारा आहे. तो गेल्या काही वर्षांपासून दुबईमध्ये काम करत होता. त्याच्याकडे दुबईची सिम कार्ड आहेत. त्यानेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना खासदर संजय राऊत यांना फोन करून धमकी दिली होती. आपण अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक असल्याचं सांगत त्याने धमकीचे फोन केले होते, अशी माहिती एटीएसने दिली आहे. आरोपीचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाहीए. आणि त्याचा गुन्हेगारीचा कुठलाही रेकॉर्ड नाहीए, असं एटीएसने स्पष्ट केलंय.
फोन नंबरवरून आम्ही धमकी देणाऱ्याचा माग काढला. आरोपीने यापूर्वी काही धमकीचे फोन केले असण्याची शक्यता एटीएसने व्यक्त केली आहे. त्याने आणखी फोन करून आणि कुठल्या राजकीय नेत्यांना धमक्या दिल्या आहेत. तसंच त्याने हे धमकीचे फोन का केले? आणि त्याच्याकडे सर्व फोन नंबर कुठून आले? याची चौकशी एटीएसकडून करण्यात येत आहे. दुबईत तो कुणाच्या संपर्कात होता आणि त्याच्याकडे कोणते अॅप आहेत, याचीही चौकशी केली जाणार आहे. त्याला १४ तारखेला सोमवारी कोर्टात हजर केलं जाईल, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसकडून देण्यात आली.
आरोपीने २ ते ६ सप्टेंबरदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि खासदार संजय राऊत यांना फोन करून धमकी दिली होती. गेल्या शनिवारी आरोपीने मातोश्रीवर फोन करून आपण दाऊद गँगचा हस्तक असल्याचं सांगत धमकी दिली होती. अभिनेत्री कंगना राणावतपासून दूर राहण्याची धमकी त्याने संजय राऊत यांना दिली होती. अनेक देशमुखांनाही कंगनाच्या मुद्द्यावर त्याने धमकी दिली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times