म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः एका पोलिसाने त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली, मारहाण केली, या अन्यायाविरोधात दाद मागूनही न्याय न मिळाल्याने अखेर त्या तरुणाने रंकाळा तलावात उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीच वाचवले, पण त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे.

शनिवारी दुपारी घडलेली ही घटना. करवीर तालुक्यातील कळंबा येथे राहणाऱ्या सुनिल शांताराम बागम याने एका पोलिसाविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनुसार करवीर पोलिस ठाण्यातील आर. एन. बरगे हा त्यांना सतत त्रास देत होता. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची त्याला धमकी देत होता. यामुळे या पोलिसाकडून आपला होणारा छळ थांबावा म्ह्णून बागम याने तक्रार दिली.

या तक्रार अर्जावर काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे तरुण संतप्त झालेला. पोलिसावर कारवाई न झाल्यास रंकाळ्यात उडी घेऊन आत्महत्या करू, असं निवेदन त्याने शुक्रवारी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांना दिलं. यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. बागम याने आत्महत्या करू नये म्हणून सकाळी पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी रंकाळ्यावर बंदोबस्त वाढवला.

सकाळपासून पोलिस आणि अग्नीशमन दलाचे कर्मचारी बागम याला रंकाळ्यावर शोधत होते. पण तो सापडत नव्हता. पोलिसांची नजर चुकवत त्याने रंकाळ्यात उडी मारली. महापालिका कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिले. तातडीने बोटीतून आत जाऊन त्याला बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. यानंतर त्याच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजवाडा पोलीस पोलीस अधिक तपास करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here