म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: हॉस्पिटलला पुरवठा करण्यात येणाऱ्या १२ ऑक्सिजन सिलिंडरची झाली आहे. चाकण परिसरात नुकतीच ही घटना उघडकीस आली असून, चोरट्यांनी टेम्पोच पळवून नेला आहे. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

टेम्पोचे चालक-मालक असलेले बाबुलाल बिसाजी चौधरी (वय ५२, रा. म्हाळुंगे) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी हे म्हाळुंगे भागातील दोन-तीन कंपन्यांत तयार होणारा ऑक्सिजन सिलिंडरद्वारे विविध हॉस्पिटलमध्ये पुरवठा करण्याचे काम करतात.

बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवस त्यांनी काही सिलिंडर हॉस्पिटलमध्ये नेऊन दिले. त्यांनतर उरलेले १२ भरलेले सिलिंडर आणि ७ रिकामे सिलिंडर असलेला टेम्पो त्यांनी घराच्या बाहेर लावला. गुरुवारी पहाटे दोन ते सकाळी आठ या कालावधीत चोरट्यांनी टेम्पो चोरून नेला. यामध्ये १२ भरलेले आणि ७ रिकामे चोरीला गेले आहेत.

करोनामुळे एमआयडीसी भागातील कंपन्यांना उत्पादनाच्या २० टक्के तर हॉस्पिटलसाठी ८० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. सध्या अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत असून, अशातच सिलिंडर चोरीला जाण्याचा प्रकार घडला आहे. चौधरी हे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा टेम्पो ज्या ठिकाणी पार्क करतात, तेथेच गुरुवारीही त्यांनी टेम्पो उभा केला होता. परंतु, यावेळेस त्यात ऑक्सिजन सिलिंडर असल्याने चोरट्यांनी तो लंपास केला आहे. म्हाळुंगे पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here