व्यवसायाने डान्सर असलेला अंकुश गौतम सुरवडे याचा दहा दिवसांपूर्वी वडाळा येथे पूर्व मुक्त मार्गावर अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना अंकुशचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्याचा मृतदेह घेण्यासाठी कुटुंबीय रुग्णालयात गेले असता त्यांना मृतदेह देण्यात आला नाही. मृतदेह दिला जात नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी तगादा लावला असता दुसऱ्याच रुग्णाच्या कुटूंबियांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
अंकुशच्या मृतदेहावर सायन येथील स्मशानभूमीत दुसऱ्याच रुग्णाच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले. मृतदेह पॅकिंग करून देण्यात आल्याने चेहरा न बघताच मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचे दुसऱ्या रुग्णाच्या कुटुंबियांनी अंकुशच्या नातेवाईकांना सांगितले. या प्रकरणी अंकुशच्या नातेवाईकांना तसेच वडाळा विभागातील नागरिकांनी सायन रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गर्दी केली होती. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. अंकूशचे कुटुंबीय गुन्हा दाखल करण्यासाठी सायन पोलीस ठाण्यात गेले असता त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर जमाव जमला असून तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
किडनी काढली
दरम्यान, रुग्णालयाने या तरुणाची किडनी काढल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर आमदार कालिदास कोळंबकर यांनीही किडनीचा भाग कापल्याचं दिसतं असं म्हटलं आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने मृतदेहाची आदलाबदल झाल्याचं मान्य केलं असून किडनी काढल्याचा आरोप फेटाळून लावल्याचं सूत्रांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times