अमरावतीः मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासांत वादग्रस्त विधान करून चर्चेत आलेल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांनी आज पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. गायीला स्पर्श करा, त्यानंतर तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर होतील, असे विधान यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमधील एका कार्यक्रमात केल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर तसेच मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मतदारसंघात पोहोचलेल्या यशोमती ठाकूर यांनी वादग्रस्त विधान केले होते. वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत त्यांनी पहिल्यांदा वादग्रस्त विधान केले होते. आत्ताच शपथ घेतलीय, अजून खिशे गरम व्हायचे आहेत. जे लोक आता विरोधात आहेत. त्या जुन्या सत्ताधाऱ्यांकडे खूप पैसे आहेत. त्यांच्याकडून लक्ष्मीदर्शन होत असल्यास नाही म्हणू नका, असे वादग्रस्त विधान ठाकूर यांनी केले होते. त्यांच्या या विधानाच विसर पडतो न पडतोच तोच त्यांनी आज पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.

गायीला आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. गाय पवित्र आहे. गायीला स्पर्श केल्यास तुमच्या मनातील नकारात्मक विचार नष्ट होतील. त्यामुळे गायीला स्पर्श करा, असे अजब विधान त्यांनी केले आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांने सार्वजनिक कार्यक्रमात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधान केल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात यशोमती ठाकूर यांना काँग्रेसच्या कोट्यातून मंत्रिपद मिळाले आहे. ठाकूर यांच्याकडे महत्त्वपूर्ण महिला व बालविकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंत्रिपदाची शपथ घेऊन महिना उलटत नाही तोच त्यांनी दोन वादग्रस्त विधान केल्याने पक्षश्रेष्ठी त्यांच्या या विधानाला किती गांभिर्याने घेतेय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here