म. टा. प्रतिनिधी, नगर: सरकारकडून करोनाची मदत म्हणून सात हजार भेटतात. हे पैसे तुम्हाला मिळून देतो, असे सांगत एका ज्येष्ठ महिलेला तिचे आधारकार्ड झेरॉक्स काढायला पाठवले, आणि तिच्या पिशवीतील दागिने घेऊन पळ काढल्याचा प्रकार घडला आहे. अहमदनगरमधील फाटा येथे काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी काल रात्री उशीरा अज्ञात व्यक्तीच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

हमीदा दादा पठाण (वय ६५) ही ज्येष्ठ महिला नेवासा-शेवगाव या बसमध्ये बसली होती. यावेळी बसमध्ये बसलेल्या एका २५ ते ३० वयोगटातील युवकाने त्यांना पिशवी उचलण्यासाठी मदत केली. तसेच त्यांच्यासोबत गप्पा मारताना सरकारकडून आता करोनाची मदत म्हणून सात हजार रुपये मिळत असल्याचे सांगितले. त्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असल्याचे हा युवक म्हणाला. त्यानंतर पठाण या नेवासा फाटा येथे बसमधून उतरल्या असता संबंधित युवक देखील बसमधून उतरला. त्यावेळी पठाण या आपल्या एका मैत्रिणीला घेऊन नेवासा फाटा येथे आल्या. तेव्हा संबंधित युवकाने पठाण यांना त्यांच्याकडे असणाऱ्या आधारकार्डची झेरॉक्स काढण्यासाठी पाठवले व झेरॉक्स काढायला जाताना दागिने पिशवीत ठेवण्यास सांगितले. त्यानंतर संबंधित महिलेने दागिने पिशवीत ठेवून ती पिशवी तिच्या मैत्रिणीकडे दिली. संबंधित महिला झेरॉक्स काढण्यास निघून गेली. त्यावेळी संबंधित महिलेच्या मैत्रिणीला युवक म्हणाला, तुमच्या मैत्रिणीला झेरॉक्ससाठी पैसे लागतात, त्यांची पिशवी द्या. त्यावर तिने दागिने असलेली पिशवी युवकाला दिली. तेव्हा युवकाने पिशवीतील दागिने घेऊन पळ काढला. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच हमीदा पठाण यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी बातम्या वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here