शिवसेना नेते संजय राऊत यांनी या पुस्तक प्रकाशनानंतर एकूण चार ट्विट केले आहे. या चारही ट्विटमध्ये त्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे. आज के शिवाजी नरेंद्र मोदी.. असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!!! अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे. दिल्लीतील भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.
या पुस्तक प्रकाशनाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय आहेत. त्यांच्याशी तुलना होऊ शकणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही आणि येणारही नाही. या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सोशल मीडियातून केली जात आहे. संजय राऊत यांनी सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयन राजे भोसले, श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे भोसले यांना उद्देशून सवाल केला आहे. नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करण्यात आल्याने हे सर्व राजे यांना मान्य आहे का?, शिवरायांच्या वंशजांनो बोला…काही तरी बोला…असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, संभाजी राजे भोसले यांनी या पुस्तकावर आक्षेप घेतला असून या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी अशी मागणी केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times