नवी दिल्लीः संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लोकसभेत मंगळवारी लडाखच्या मुद्द्यावर निवेदन देणार आहेत. पूर्व लडाखमध्ये अनेक महिन्यांपासून चीनबरोबर तणाव सुरू आहे. दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही तणाव दूर झालेला नाही. आता सरकारने या विषयावर अधिकृत निवेदन देण्यासाठी विरोधकांचा दबाव आहे. हे पाहता संरक्षणमंत्री मंगळवारी दुपारी ३ वाजता ‘लडाखमधील सीमेवरील परिस्थिती’ची विषयी देशाला माहिती देतील.

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीच्या निमित्ताने हा मुद्दा भारताने चीनसमोर मांडला होता. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षणमंत्र्यांमध्ये सुमारे २ तास बैठक चालली. दोन्ही देश चर्चेतून सीमावाद सोडवतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पण दोन्ही देशांचे सैनिक सीमेवरून कधी मागे हटतील यावर मात्र या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही.

संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये बैठक झाली होती. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात ही बैठक झाली. भारत कुठल्याही स्थितीत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करेल, असं भारताकडून या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं होतं. दोन्ही देश चर्चा सुरू ठेवतील आणि आणि हा वाद शांततेनं सोडवण्यावर भर देतील, असा निर्णय या बैठकीत घेतला गेला. पण नंतर चीन पलटला. सीमावाद सोडवण्याची पूर्ण जबाबदारी भारताची आहे, असं चीन म्हणाला. तर चीनने सीमेवर एप्रिलची पूर्वीची जैसे थे स्थिती ठेवली नाही तर व्यापार संबंध सामान्य राहणार नाहीत हेही भारताने स्पष्ट केलं.

पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) दोन्ही देशांच्या सैन्यात गेल्या काही महिन्यांपासून तणाव आहे. सैन्य आणि मुत्सद्दी स्तरावर चर्चेद्वारे सीमेवरील परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता या सर्व बाबींवर विरोधकांना सरकारकडून उत्तरं हवी आहेत. हे पाहता मंगळवारी राजनाथ सिंह यांचं निवेदन अत्यंत महत्त्वाचं ठरेल आणि स्थिती अगदी स्पष्ट होईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here