म. टा. प्रतिनिधी, पिंपरीः करोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र सरकारचे आदेश आणि बिलांसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत असतानाही महापालिकेचे अधिकारी नाहक मानसिक त्रास देत आहेत. गुन्हेगारांसारखी वागणूक देत आहेत. परंतु, अडचणीच्या काळात आम्हांलाही समजून घ्या, अशी व्यथा पिंपरी-चिंचवडमधील खासगी हॉस्पिटलचालकांच्या शिष्टमंडळाने सोमवारी मांडली. करोनाबाधितांवर उपचार करीत असलेल्या ग्लोबल, वात्सल्य, मेट्रो, लाइफ पॉईंट, स्पंदन, गोल्डन केअर, फिनिक्स, प्लस, जीवन ज्योती, ओझस, स्टार, अँपेक्स, भोईर आदी हॉस्पिटलच्या मालकांनी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोरील अडचणींबाबत माहिती दिली.

करोनाबाधितांवर उपचार करीत असलेल्या ग्लोबल, वात्सल्य, मेट्रो, लाइफ पॉईंट, स्पंदन, गोल्डन केअर, फिनिक्स, प्लस, जीवन ज्योती, ओझस, स्टार, अँपेक्स, भोईर आदी हॉस्पिटलच्या मालकांनी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोरील अडचणींबाबत माहिती दिली.

राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार, आमच्या रुग्णालयांना पूर्ण समर्पित कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित केले आहे. करोना कालावधीत वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. ऑक्सिजनचे शुल्क जास्त आहे. बिलांबाबत सरकारच्या नियमांचे पालन केले जात असताना पालिकेचे अधिकारी मानसिक त्रास देत आहेत. बिलांच्या ऑडीटसाठी १२-१२ तास बसवून ठेवले जाते. त्याचा कामावर परिणाम होत आहे. संबंधित अधिकारी आमच्यावर गुन्हेगारांसारखे वागतात. त्यांनी सूचनांचा योग्यरित्या अभ्यास केल्याशिवाय आम्हाला सूचना पाठविल्या आहेत, अशी तक्रार केली.

हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात बिलाबाबत तक्रारींच्या अनुषंगाने जरूर तपासणी व्हावी. आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत. मात्र, आधीपासूनच दडपणाखाली काम करत आहोत. त्यात अकारण छळ करण्याचे प्रकार चालू राहिल्यास या परिस्थितीतही कोविड केंद्र बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सर्व रुग्णांचे तपशील, विविध डॅशबोर्ड, ईमेल आणि व्हॉट्स ॲपवर अपलोड करण्याचा सरकारचा आग्रह आहे. त्याचा त्रास नाही. परंतु, साथीच्या आजाराच्या गंभीर परिस्थितीमुळे या कामासाठी लिपिक नाहीत. कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, या मुद्याकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले. कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी त्यात गुंततात. त्यामुळे गंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ कमी पडतो, असे निदर्शनास आणून दिले.

शासकीय नियम व दरपत्रकाचे पालन करतो. त्वरित ऑडिट आणि आवश्यक कार्यवाही तातडीने शक्य़ होत नाही. कागदपत्रे व्यवस्थापित करणे फारच अवघड आहे. याशिवाय दस्तऐवज संदर्भातील कामात सुलभता येणे गरजेचे आहे. कोविड डेटा अपलोड करण्यासाठी पोर्टल असावे. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रूग्णांचा डेटा अपलोड करणे खूप कठीण आहे, असे स्पष्ट केले.

काही रुग्ण शासनाच्या निकषांनुसारही बिले देत नाहीत. अशा परिस्थितीत आमच्याकडून काय अपेक्षा आहे?, असा प्रश्न उपस्थित करून, सर्व प्रयत्न, मनुष्यबळ ठेवून, जोखीम स्वीकारून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठिंबा देत आहोत. मानवतेच्या पार्श्वभूमीवर समर्पित सेवा देत आहेत. त्यामुळे आमचा छळ करण्याऐवजी अधिकाऱ्यांकडून संरक्षण आवश्यक आहे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचे शारीरिक आणि मानसिक ताणतणाव वाढले आहेत, असे नमूद केले.

शिष्टमंडळाची प्रमुख गाऱ्हाणी

– सरकारी यंत्रणेकडून नाहक त्रास नसावा
– सरकारच्या सूचनांचा सखोल अभ्यास व्हावा
– कोविड डेटा अपलोडसाठी स्वतंत्र पोर्टल असावे
– कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य
– छळाऐवजी अधिकाऱ्यांकडून संरक्षण मिळावे
– आमच्यावरील दडपण हलके करण्यासाठी प्रयत्न

सध्याचा काळ कठीण आहे. केवळ पैसे कमविण्याचे उद्दिष्ट ठेवू नका. रुग्णसेवेला प्राधान्य द्या. सरकारच्या आदेशाचे पालन करूनच बीलआकारणी करावी. रुग्णांची अडवणूक करू नका, अशा सूचना मी शिष्टमंडळाला केल्या. महापालिकेकडून होणाऱ्या त्रासाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल. तुमच्या समस्या शासन दरबारी मांडल्या जातील, असे आश्वासन दिले आहे.
– श्रीरंग बारणे (खासदार)

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here