नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात सातत्याने दररोज पाचशे ते आठशेच्या दरम्यान करोना बाधित वाढत होते. गेल्या सहा महिन्यात अद्यापर्यंत एक हजारापेक्षा जास्त रुग्ण एकाच दिवशी वाढले नव्हते. मात्र, सोमवारी दिवसभरात करोना बाधितांची रुग्णसंख्या ही तब्बल १ हजार ३६६ ने वाढली आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात बाधित वाढण्याची ही नगर जिल्ह्यातील गेल्या सहा महिन्यातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे हा आकडा आतापर्यंतचा उच्चांक ठरला असून धडकी भरवणारा आहे.
दिवसभरात जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये २७५ जणांचे अहवाल हे करोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर, खासगी प्रयोगशाळेत करोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांची संख्या ७२० आहे. याशिवाय अँटीजेन चाचणीत ३७१ जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात आज ८३५ रुग्णांनी करोनावर मात केली असून यासर्वांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २६ हजार ९९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.९२ टक्के इतके झाले आहे. मात्र, दुसरीकडे करोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्यामुळे करोनाचा फैलाव रोखण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणांसमोर उभे राहिले आहे.
आतापर्यंत आढळलेले एकूण करोनाबाधित : ३२ हजार १६३
– करोना आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या : २६ हजार ९९१
– उपचार सुरू असलेले रूग्ण : ४ हजार ६७७
– करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या : ४९५
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times