म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयामधील रक्तपेढीमध्ये केवळ पूर्ण रक्ताचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने दिलेला आहे. त्यामुळे रक्तातून लाल पेशी विघटन करून तयार करण्याची प्रक्रिया इथे होत नाही, तसेच प्लाझ्मा फ्रीज करून प्लाझ्मा निर्माण करण्यात येत नाही. तरीसुद्धा या प्रकारचा प्लाझ्मा साठवण्यासाठी एका डीप फ्रीजची अनावश्यक खरेदी या रक्तपेढीसाठी करण्यात आलेली आहे. करोनामुळे पालिकेला आर्थिक तूट निर्माण झालेली असतानासुद्धा अशा अनावश्यक पद्धतीने केलेल्या खर्चामुळे यात अधिक भर पडली आहे.

या डीप रेफ्रिजेटरची गरज नसताना हा फ्रीज का घेण्यात आला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जर मागणीच केलेली नाही, तर खरेदी का करण्यात आली. या डीप फ्रीजचा रुग्णालयाला काय उपयोग होत आहे, हे प्रश्नही यामुळे उपस्थित झाले आहेत. यामध्ये गैरव्यवहार झाला असून ठेकेदाराला नफा झाल्याचे दिसून येते, असा आरोप होत आहे.

के. बी. भाभा रक्तपेढीमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्यामुळे रक्तपेढी २४ तास सुरू ठेवण्यात वारंवार अडचण निर्माण होते. ‘मटा’कडे असलेल्या ‘पर्चेस ऑर्डर’च्या कागदपत्रांमधून नॅशनल रेफ्रिजरेशन वर्क, मुंबई यांच्याकडून ही खरेदी करण्यात आल्याचे नमूद आहे. या फ्रीजची किंमत चार लाख ५५ हजार ८१० रुपये इतकी आहे, तर तापमान नोंदणी आणि बॅटरी बॅकअपसाठी अनुक्रमे ४२ हजार ५६० आणि ३० हजार ५९० अतिरिक्त किंमत मोजण्यात आली आहे. हे दोन्हीही घटक डीप फ्रीजमध्ये लावलेले असतानाही त्यासाठी वेगळी किंमत आकारण्यात आली आहे.

या संदर्भात रक्तपेढीचे प्रमुख व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यासंदर्भात कोणतीही माहिती देता येणार नाही, असे सांगितले. या डीप फ्रीजची खरेदी कार्यकारी अभियंता, (रेफ्रिजरेशन) पालिका वर्कशॉपद्वारे करण्यात आली होती.

या पर्चेस ऑर्डरमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की रक्तपेढीमध्ये असणारा एक जुना फ्रीज परत घेण्यात येईल व त्यासाठी दोन हजार ५०० चा परतावा या बिलामध्ये देण्यात येईल, तसेच दोन जुने डीप रेफ्रिजरेटर घेण्यात येतील व त्यासाठी पाच हजार २०० ( प्रत्येकी दोन हजार ६००) इतकी सूट देण्यात येईल. नव्या फ्रिजची किंमत चार लाख ४८ हजार ७८० व डीप रेफ्रिजेटरची किंमत ५ लाख २८ हजार ९६० इतकी असल्यामुळे वरील देण्यात येणारी सूट नगण्य आहे.

लेखापरीक्षणाची गरज

जर हे फ्रीज मोडीत काढले, तर पालिकेला अधिक रक्कम मिळेल, अशी चर्चा येथील कर्मचाऱ्यांमध्ये आहे. के. बी. भाभा रुग्णालयाकडे जुने डीप रेफ्रिजरेटर उपलब्ध नाहीत, तरीसुद्धा अशी ऑर्डर कशी काढण्यात आली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या विभागातील अन्य खरेदीचेही लेखापरीक्षण होण्याची गरज आहे. करोना काळामध्ये पालिकेच्या अन्य रुग्णालयामध्ये किती वापराविना पडून आहेत, किती साठवणुकीसाठी वापरण्यात येतात, यासंदर्भातही चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here