म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह येथील जंगलात पुरल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली असून समलैंगिक संबंधातून ही हत्या केल्याचे म्हटले जात आहे. अटक करण्यात आलेले आरोपी रेल्वे आणि प्राप्तिकर खात्यामध्ये नोकरीला आहेत.

मुंबई महापालिकेत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेला ४५ वर्षीय व्यक्ती हरवला असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी २८ ऑगस्ट रोजी नागपाडा पोलिस ठाण्यात केली. पालिकेत चांगल्या पदावर काम करणारा व्यक्ती अचानक घरातून गायब झाल्याने आणि दोन दिवस घरी परतला नसल्याने नागपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश कदम, दुष्यन्त चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदेश मांजरेकर, उपनिरीक्षक एकनाथ देसाई, बी. डी. जाधव, अनिल शिंदे यांच्या पथकाने शोध सुरू केला. तपासादरम्यान या व्यक्तीचा मोबाइल बंद येत होता. बँकेच्या व्यवहारावरही लक्ष ठेवले असता त्यातूनही काही व्यवहार होत नसल्याचे लक्षात आले. घरात पत्नीशी उडणाऱ्या खटक्यांमुळे ही व्यक्ती घराबाहेर पडल्याचा अंदाज बांधला जात होता. मात्र मोबाइल तसेच इतरही व्यवहार बंद असल्याचे आढळल्याने पोलिसांनी आणखी खोलवर जाऊन तपास सुरू केला. या व्यक्तीचे कॉल रेकॉर्ड तपासले असताना तो हरवण्यापूर्वी संपर्कात असलेल्या व्यक्तीचे नंबर पोलिसांना मिळाले. या नंबरवरून एलफिन्स्टन परिसरात राहणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांच्या चौकशीत सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या दोघांनी अखेर हत्येची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या एका तरुणाचे मृत व्यक्तीशी समलैगिंक संबंध होते.

मित्राच्या मदतीने काढला काटा

समाजमाध्यमांवरून त्यांची मैत्री झाली होती. मात्र घरचे लग्न जमविण्याचा विचार करीत असल्याने हे संबंध कायम ठेवण्यास आरोपी तरुणाने नकार दिला. तरीही ही व्यक्ती त्याचा पिच्छा सोडत नव्हती. अखेर या तरुणाने आपल्या मित्राच्या मदतीने या व्यक्तीचा काटा काढला. दारूची पार्टी असल्याचे सांगून दोघेजण त्याला भिवंडी येथे घेऊन गेले. या ठिकाणी त्याला दारू पाजली. नशेतच चाकूने त्याची हत्या केली आणि येथून जवळच असलेल्या जंगलात दोन दिवस आधी खणून ठेवलेल्या खड्ड्यात त्याला पुरून टाकले. दोन्ही आरोपींना न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here