मुंबई: शिवसैनिकांनी मारहाण केलेले निवृत्त नौदल अधिकारी यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करणार असल्याचं सांगत राज्यात गुंडगिरी खपवून घेणार नसल्याचंही म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचं आक्षेपार्ह कार्टुन व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. या मुद्द्यावरून भाजपने राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलेला असतानाच शर्मा यांनी आज राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना आता आपण संघ आणि भाजपसाठी काम करणार आहोत. आता गुंडगिरी खपवून घेणार नाही. यावेळी त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा पुनरुच्चारही केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढाही उपस्थित होते.

काही माजी सैनिकांनीही शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय सैनिक संस्था या निवृत्त सैनिकांच्या संघटनेनेही शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. या संघटनेचे मुंबई अध्यक्ष पंजाबराव लक्ष्मण मुधाने यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर येत्या तीन दिवसात सर्व निवृत्त अधिकारी आझाद मैदानात धरणे आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे.

कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये राहणारे नौदलाचे निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांनी एक व्यंगचित्र पोस्ट केल्याप्रकरणी शुक्रवारी शिवसैनिकांनी त्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी सहा शिवसैनिकांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना जामिनावर सोडून देण्यात आले होते. मात्र, भाजपने पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेऊन धरणे धरल्याने अखेर आज या सहाही शिवसैनिकांना पुन्हा अटक करण्यता आली आहे. ‘ज्या निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांचा डोळा फोडला, तसेच त्यांच्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज असूनही, या प्रकरणातील हल्लेखोरांना जामीन मिळतो. यात ठाकरे सरकारची भूमिका संशयास्पद असून, या सर्व गोष्टींचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही,’ असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here