वाचा:
नगर जिल्ह्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. काल तर एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल १ हजार ३६६ बाधित वाढले आहेत. त्यातच आता करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. दोन आठवड्यापूर्वी माजी नगरसेवक निखील वारे व पवार यांनी नगरच्या अमरधाम मधून किती करोना बाधितांवर अंत्यसंस्कार केले, याची माहिती घेतली होती. तेव्हा अमरधाममधून देण्यात आलेली आकडेवारी व प्रशासनाकडील आकडेवारी यामध्ये मोठी तफावत होती. तेव्हापासून सातत्याने करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची खरी आकडेवारी द्या, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात येत होती. मात्र, सातत्याने त्याला टाळाटाळ करण्यात आल्याने अखेर आज महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या दालनात वारे, पवार यांच्यासह ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या करोना बाधितांच्या मृत्यूच्या आकडेवारीवरून गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर केले आहेत.
वाचा:
‘करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी दाखवत प्रशासनाला स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे. कारण मृत्यूदर जास्त दाखवला तर सरकारकडून प्रशासनाला विचारणा होईल. मृत्यू का होतात? येथे सुविधा दिल्या जात नाहीत का? असे अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे खरी आकडेवारी झाकून केवळ शाबासकी मिळून घेण्यासाठी मृत्यूदर कमी दाखवला जातोय काय, अशी शंका आहे. प्रशासनातील अधिकारी लोकप्रतिनिधींची दिशाभूल करीत खोटी आकडेवारी देत आहे. अधिकारी खोटी माहिती देतात,’ असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.
तर, नागरिकांसाठी हेल्पालाइन सुरू करणार
वारंवार मागणी करून देखील प्रशासनाकडून करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा खरा आकडा दिला जात नसेल, तर आता आम्ही नागरिकांसाठी हेल्पलाइन सुरू करू. ज्यांच्या घरात करोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, त्यांना ती माहिती या हेल्पलाइनवर देण्याचे आवाहन करू. प्रशासनाला वाटत असेल की आम्हाला खरी आकडेवारी मिळू द्यायची नाही. पण आम्ही ती मिळवणारच, असेही आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनानंतर आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना पत्र देऊन करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी २४ तासाच्या आत देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times