भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून एकनाथ खडसे, त्यांचे समर्थक आणि अंजली दमानिया यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयीन लढाई सुरू आहे. याच मुद्यावरून यांनी अंजली दमानिया यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. या आरोपांना एका व्हिडिओद्वारे लागलीच प्रत्युत्तर देत दमानियांनी आपली बाजू मांडली आहे. दमानिया म्हणाल्या की, खडसेंविरोधात माझी लढाई मुंबई उच्च न्यायालयात सुरू असून, त्याठिकाणी मी जवळपास अकराशे पानांची याचिका दाखल केली आहे. त्यात खडसेंच्या विरोधातील सर्व पुरावे न्यायालयासमोर मांडले आहेत. त्यामुळे दमानिया न्यायालयात पुरावे सादर करू शकल्या नाहीत. त्या पळ काढत आहेत, हे आरोप हास्यास्पद आहेत. विशेष म्हणजे, पुण्याला जो ‘सी समरी रिपोर्ट’ दाखल करण्यात आला होता, त्याला आव्हान देणारी प्रोटेस्ट पिटिशन दाखल केली होती. त्यावर येत्या ४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असून, मला त्रास देण्यासाठी खडसेंच्या समर्थकांनी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी माझ्याविरुद्ध दावे दाखल केले आहेत, असेही दमानिया म्हणाल्या.
२३ जानेवारी रोजी बाजू मांडणार
खडसेंविरोधात विभागाकडे मी दाखल केलेली केस तर ‘ओपन अँड शट’ अशी आहे. त्यात ज्या कंपन्या अस्तित्त्वातच नाहीत, अशा कंपन्यांमधून त्यांच्या खात्यात पैसे कसे आले, त्या पैशांतून त्यांनी भोसरीची जमीन खरेदी केली. याचे सर्व पुरावे मी एसीबीकडे दाखल केलेल्या याचिकेत दिले आहेत, असा दावाही दमानियांनी केला आहे. जळगाव न्यायालयात दाखल करण्यात आलेला दावा हा अशोक लाडवंजारी नामक व्यक्तीने दाखल केला नसून, तो स्वत: खडसेंनीच दाखल केला आहे. त्यामुळे खडसे खोटे बोलत आहेत. त्यावर आता २३ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीला मी हजर राहून, माझी बाजू मुद्देसूदपणे मांडणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times