नवी दिल्लीः शांघाय सहकार्य संघटनेच्या (SEO) सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या (एनएसए) महत्त्वपूर्ण बैठकीवर भारताने मंगळवारी बहिष्कार टाकला. पाकिस्तानच्या प्रतिनिधीने ‘काल्पनिक’ नकाशाचा वापर करत भारतीय प्रदेशावर आपला दावा केला होता. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे या व्हर्च्युअल बैठकीत भाग घेणार होते.

रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पाकिस्तानी सुरक्षा सल्लागाराने हेतुपुरस्सर हा काल्पनिक नकाशा सादर केला. हा नकाशा काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अधिकृतपणे जाहीर केला होता. यजमान देशाने दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष आणि एससीओ नियमांचे हे उघड उल्लंघन आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले.

भारताने यजमान रशियाशी सल्लामसलत करून त्याचवेळी बैठक सोडली. ही एक व्हर्च्युअल बैठक होती. अपेक्षेप्रमाणे या बैठकीत पाकिस्तानने भ्रामक विचार मांडले, असं नुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं.

एससीओ चार्टरचे पूर्ण उल्लंघन

पाकिस्तानची ही कृती एससीओ चार्टरचे ‘सर्रास उल्लंघन’ आहे. एससीओ सदस्य देशांच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याच्या सर्व स्थापित नियमांच्या विरोधात आहे. पाकिस्तानने बेकायदेशीर नकाशा वापरल्याबद्दल भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आणि रशियाच्या प्रतिनिधीनेही पाकिस्तानच्या प्रतिनिधीला तसे न करण्यास पटवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, असं सरकारी सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं.

राष्ट्रीय सुरक्षा विषयावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक मोइद डब्ल्यू युसुफ हे या बैठकीत पाकिस्तानचे प्रतिनिधी होते. भारताचे एनएसए अजित डोवल यांच्याबद्दल वैयक्तिकरित्या आपण आभारी आहोत, असं रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलई पेट्रेशेव्ह यांनी सांगितलं. रशियाने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला नाही. पाकिस्तानच ‘चिथावणी देणारे’ कृत्यामुळे एससीओमधील भारताच्या सहभागावर कोणताही परिणाम होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही प्रभावशाली प्रादेशिक गट एससीओचे सदस्य आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here