म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: करोनाच्या चाचणीचे अहवाल २४ तासांच्या आतमध्येच दिले जावेत, अशी सक्त ताकीद पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वैद्यकीय विभागाला दिली आहे. दिरंगाई झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

शहरात सध्या रोज सुमारे पाच हजार करोनाच्या चाचण्या होत आहेत. रॅपिड अँटिजेन चाचणी अहवाल अर्ध्या तासात प्राप्त होतो. तर, आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल एक किंवा दोन दिवसांत प्राप्त होतो. परंतु, तळवडे-रुपीनगर येथील एका महिलेचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दहा दिवसांनी प्राप्त झाला. त्याच्या एक दिवस आधीच त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी पेशंटचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी येत असल्याचे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कळविले. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला.

या घटनेबाबत माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली. चाचणी केल्यानंतर अहवालासाठी रुग्णांना हेलपाटे मारावे लागतात. शहरातील रुग्णसंख्या साठ हजारांवर गेली आहे. बळींची संख्या एक हजारांहून अधिक आहे. दिवसाला सरासरी २०-२५ जण मृत्युमुखी पडत आहेत. रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वेगाने वाढतच आहे. अशा वेळी प्रशासनामध्ये समन्वय असायला हवा. अहवाल येईपर्यंत संक्रमित रुग्ण व त्यांचे नातेवाईक समाजात वावरतात. त्यामुळे विषाणूंचा प्रसार होतो, याकडे लक्ष वेधण्यात आले.

घटनेचे गांभीर्य आणि तक्रारीची दखल घेत हर्डीकर यांनी वैद्यकीय विभागाला सक्त ताकीद दिली आहे. याप्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे सूचित केले आहे. याशिवाय प्रलंबित चाचण्यांबाबत वेळेत कार्यवाही व्हावी, असे नमूद केले.

चाचण्यांबाबत प्रमुख मागण्या

– चाचणी झालेल्या रुग्णांकडून संक्रमण रोखा
– स्वॅब तपासणीचा अहवाल ४८ तासांत मिळावा
– दोन प्रकारच्या चाचण्यांमध्ये समन्वय हवा
– चाचणीनंतर रुग्णांना अधिकृत अहवाल मिळावा
– आयसोलोशन तपासणी यंत्रणा बंद नसावी

ग्रामीण भागातील चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) कामावर ताण निर्माण झाला होता. त्यामुळे अहवाल उशिरा येण्याचे प्रकार घडत होते. परंतु, आता दिरंगाई होणार नाही, या अनुषंगाने नियोजन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत २४ तासांच्या आतमध्येच चाचणी अहवाल रुग्णाला मिळावा, अशा सक्त सूचना केल्या आहेत.
– श्रावण हर्डीकर (आयुक्त)
पिंपरी-चिंचवड महापालिका

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here