म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: राज्य सरकारच्या सूचनेनुसार संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्याचा निर्णय मंगळवारी (१५ सप्टेंबर) घेण्यात आला. शहरात दोन टप्प्यांमध्ये ही मोहिम राबविली जाणार असून, सुमारे २५ लाख नागरिकांच्या तपासणीचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे.

करोनाबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी, कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करणे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण राज्यभरात मंगळवारपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी नियोजनाची बैठक स्थायी समितीच्या सभागृहात झाली.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, या मोहीमेसाठी १२ स्वयंसेवक प्रत्येक लोकप्रतिनिधींकडून व १२ स्वयंसेवक महिला बचत गटांकडून घेण्याचे नियोजन आहे. स्वयंसेवक किमान दहावी उत्तीर्ण असावा. त्याला स्मार्टफोन वापराचे ज्ञान असणे आवश्यक आहे. माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये पालिका कार्यक्षेत्रातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी, कोमोर्बिड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीशः भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. शहरातील २४ लाख ७६ हजार ४८३ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेमुळे करोना विषाणूची साखळी तोडून करोना आटोक्यात आणण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. शहर करोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी मोहिमेस सहकार्य करावे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणारी मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी दिवसाला किमान २५ घरांना स्वयंसेवकांनी भेटी देणे आवश्यक आहे. यासाठी जास्तीत जास्त पथकांची नियुक्ती करावी. काम करण्याऱ्या स्वयंसेवकांना मानधन द्यावे.

आमदार महेश लांडगे म्हणाले, मोहिमेमध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचा-यांना वाढीव अतिकालीन भत्ता द्यावा. पन्नास वर्षे वयोगटापुढील लोकांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करू नये. काम करण्याऱ्या स्वयंसेवकांना करोना योद्धा म्हणून सुरक्षा कवच देण्यात यावे. प्रत्येक पथकामध्ये एक महिला, एक पुरुष स्वयंसेवक व पालिका कर्मचारी असावा.

बैठकीस उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते सचिन चिखले, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे उपस्थित होते.

मोहिमेचा तपशील

पहिला टप्पा – १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२०
दुसरा टप्पा – १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२०
सर्वेक्षण उद्दीष्ट – २४ लाख ७६ हजार ४८३ नागरिक
भेट द्यावयाची घरे – सहा ते सात लाख
स्वयंसेवक टिम – दोन हजार १६६

काय तपासणार?

– कुटुंबातील प्रत्येक सदस्य
– ऑक्सिजन लेव्हल (एसपीओ2)
– कोमोब्रिड कंडीशन
– ताप, खोकला
– दम लागणे

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here