सांगली: संसर्गानंतर निर्माण झालेले गैरसमज आणि पसरलेल्या अफवांमुळे व्यवसाय कोलमडला होता. अनेक व्यावसायिक कर्जबाजारी झाले, तर अनेकांना मागणीअभावी अंडी आणि कोंबड्या फेकून द्याव्या लागल्या. मात्र आता प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अंडी, चिकन खाण्याचा सल्ला आरोग्य यंत्रणांकडून मिळत असल्याने कुक्कूटपालन व्यवसाय पुन्हा तेजीत आला आहे. अंड्याचे दर प्रति नग सात रुपयांपर्यंत तर चिकनचे दर प्रति किलो २०० ते २५० रुपयांपर्यंत गेल्याने या व्यवसायाला अच्छे दिन आले आहेत.

ग्रामीण भागात शेतीपूरक व स्वयंरोजगाराचे साधन असलेला कुक्कूटपालन व्यवसाय लाखो लोकांच्या रोजीरोटीचे साधन आहे. २००६ मध्ये आलेल्या बर्ड फ्लूच्या साथीनंतर यंदा या व्यवसायाला करोना संसर्गाचा मोठा फटका बसला. चिकनमधून संसर्ग होत असल्याच्या अफवा सोशल मीडियातून व्हायरल झाल्यामुळे जानेवारी महिन्यापासूनच चिकन आणि अंड्यांची मागणी कमी झाली. मागणीअभावी दर कोसळले. २५ मार्चपासून देशभर सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे कुक्कूटपालन व्यवसाय उद्ध्वस्त झाला. वाहतूक बंदी आणि जिल्हा बंदीमुळे कोंबड्यांना खाद्य पोहोचू शकले नाही. अंडी आणि कोंबड्यांची वाहतूक थांबली. हॉटेल्स, मॉल, बाजार बंद झले, तर यात्रा, जत्रा रद्द झाल्याने अंडी आणि कोंबड्यांची मागणी ठप्प झली.
लॉकडाउनपूर्वी राज्यात रोज सुमारे अडीच कोटी अंड्यांचा पुरवठा सुरू होता, तर सुमारे दीड कोटी कोंबड्यांची विक्री केली जात होती. उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि मागणी नसल्याने अनेक व्यावसायिकांनी २०-३० रुपयांना कोंबड्यांची विक्री केली. अंड्यांचे दरही दोन ते तीन रुपयांपर्यंत खाली आले होते. व्यवसायाचे आर्थिक गणित विस्कटल्याने अनेकांवर अंडी, कोंबड्या खड्ड्यात पुरण्याची वेळ आली. ५० टक्के व्यावसायिकांनी कुक्कूटपालन थांबवले. पोल्ट्रीधारकांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे गाऱ्हाणे मांडून मदतीची मागणी केली. मात्र, त्यांना आश्‍वासनांशिवाय काहीच हाती लागले नाही. सहा-सात महिन्यांच्या संकटानंतर हा व्यवसाय आता पुन्हा उभारी घेत आहे.

वाचा:

ज्या संकटामुळे कुक्कूटपालन व्यवसाय कोलमडला त्याच करोना संसर्गामुळे या व्यवसायाला पुन्हा अच्छे दिन आले आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लोकांनी अंडी, चिकन खावे असा सल्ला आरोग्य यंत्रणांकडून दिला जात आहे. सरकारनेही याला प्रोत्साहन दिल्याने कोव्हिड उपचार केंद्र आणि सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णांना रोज अंडी खायला दिली जात आहेत. यामुळे अंड्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. उत्पादनात घट आणि मागणीत वाढ असल्याने अंडी, चिकनचे दर वाढले आहेत. सध्या पोल्ट्री धारकांकडून पाच ते सव्वापाच रुपये या दराने अंड्यांची खरेदी सुरू आहे, तर बाजारात अंड्यांचे दर सात रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. चिकनचे दर प्रति किलो २०० ते २५० रुपयांवर पोहोचले आहेत. यामुळे गेल्या पाच-सहा महिन्यात झालेले नुकसान भरून निघण्यास काही प्रमाणात मदत होत आहे. उत्पादनात घट असल्याने ग्राहकांना मात्र यासाठी आणखी काही काळ ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत.

वाचा:

राज्याची रोजची मागणी

सुमारे अडीच कोटी अंडी

सुमारे दीड कोटी कोंबड्या

वाढत्या दलालीमुळे दरवाढ

अंड्यांचा उत्पादन खर्च सध्या प्रति नग चार ते साडेचार रुपयांपर्यंत आहे. पोल्ट्री धारकांकडून दलाल सरासरी पाच रुपयांना अंड्याची खरेदी करतात. किरकोळ बाजारातील दर सात रुपयांवर गेला आहे. पोल्ट्रीधारक ते विक्रेता यांच्यामधील दलाल प्रति नग दीड ते दोन रुपये काढतात. वाढत्या नफेखोरीमुळे पोल्ट्रीधारक आणि ग्राहकांचे नुकसान होत असल्याची तक्रार पोल्ट्रीधारकांची आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here