नवी दिल्ली : अनलॉकअंतर्गत निर्बंध शिथिल करून बाजारपेठ पूर्ववत करण्याचे प्रयत्न सरकार करत आहे. मात्र त्याचवेळी करोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे चालू वर्षात वृद्धीदराचा वेग संथच राहील, असे मत रिझर्व्ह बँक गव्हर्नर यांनी व्यक्त केले. उद्योगांची शिखर संघटना फिक्कीने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये त्यांनी मते मांडली.

विकासाला चालना देण्याबरोबरच बाजारात रोकड तरलता कायम ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक कटिबद्ध आहे. पहिल्या तिमाहीत विकासदर उणे २३.९ टक्के इतका प्रचंड खाली घसरला होता. ‘जीडीपी’ची आकडेवारी करोना नुकसनीचे प्रतिबिंब आहे, असे दास यांनी यावेळी सांगितले. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने सुरुवातीला देशभर कठोर टाळेबंदी लागू केली होती. त्यामुळे जीडीपीमध्ये मोठी घसरण अपेक्षित होती, असे दास यांनी सांगितले.

करोनाचे संकट अद्याप कमी झालेले नाही. मात्र यात जागतिक बाजारपेठेत संधी देखील आहे. त्याचा फायदा देशातील कंपन्यांनी घ्यायला हवा. जागतिक दर्जाची उत्पादने तयार करून कंपन्यांनी निर्यातीतील संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दास यांनी यावेळी केले. करोना संकटात सर्व प्रकारचे आव्हान स्वीकारण्यास सज्ज आहोत, अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. उद्योगांनी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भांडवली आणि वित्तीय बाजारपेठेतील घडामोडींवर रिझर्व्ह बँक लक्ष ठेवून आहे, असे त्यांनी सांगितले.

देशातील करोना रुग्णांची अनियंत्रित वेगाने वाढत आहेत. या धोकादायक साथीच्या आजाराचा संसर्ग आतापर्यंत ५० लाखाहून अधिक नागरिकांना झाला आहे. तर ८२ हजाराहून अधिक जणांचा आतापर्यंत करोनाने मृत्यू झाला आहे.देशात करोना रुग्णांची एकूण वाढून ५०,०८,८७८ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत ८१,९६४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्याच वेळी, करोनामुळे आतापर्यंत ८२,०३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

४० वर्षांत प्रथमच भारतीय अर्थव्यवस्था आक्रसणार
जगभरातील अनेक मानांकन एजन्सी भारतीय अर्थव्यवस्थेच्या दयनीय स्थितीबाबत सांगत असतानाच मंगळवारी आशियाई विकास बँकेने (एडीबी) भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात उणे ९ टक्क्यांवर जाईल, असे भाकित केले. गेल्या ४० वर्षांत प्रथमच भारतीय अर्थव्यवस्था आक्रसणार असल्याचेही एडीबीने म्हटले आहे. एडीबीने पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे वाटचाल करेल, असेही आपल्या एशियन डेव्हलपमेंट आऊटलुक या अहवालात नमूद केले आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जीडीपी सध्याच्या पातळीपेक्षा ८ टक्क्यांनी वाढेल. माणसांचे चलनवलन आणि व्यावसायिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे जीडीपी वाढण्यास मदत मिळणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here