नेटके संयोजन आणि वैविध्यपूर्ण उपक्रमांनी लक्षवेधी ठरलेले उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी पुस्तक विक्रीसाठीही चर्चेत राहिले. संमेलनाच्या पहिल्या दिवशी पुस्तक विक्री झाली नाही. मात्र, अखेरचे दोन दिवस पुस्तक खरेदीसाठी वाचकांची झुंबड उडाली. एकूण तीन दिवसात जवळपास दोन कोटी रुपयांची विक्री झाल्याची माहिती प्रमुख विक्रेत्यांनी दिली. संमेलन परिसरात एकूण २५० दालने उभारण्यात आली होती. प्रकाशकात वाद असल्याने अपेक्षित असलेली ४०० दालनांची संख्या गाठता आली नाही. मात्र, सुरू असलेल्या दालनात तुफान खरेदी झाली. राज्यातील आघाडीच्या १५ प्रकाशन संस्थांनी अधिक संख्येने दालने उभारली होती. लहान-मोठ्या १०० विक्रेत्यांची स्वतंत्र दालने होती. दोन दिवस शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अधिक गर्दी होती. या विद्यार्थ्यांनी किमान एक पुस्तक खरेदी केल्याने विक्रीला अधिक हातभार लागला असे विक्रेत्यांनी सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्यासह लातूर, बीड, औरंगाबाद, परभणी या जिल्ह्यातील साहित्य रसिक सर्वाधिक संख्येने उपस्थित होते. शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये यांनी वाचनालयासाठी लक्षणीय पुस्तक खरेदी केली.
दरम्यान, एकूण पुस्तक विक्रीचा आकडा निश्चित करण्यासाठी आठ दिवस लागण्याची शक्यता आहे. पुस्तक विक्रीच्या उत्पन्नाचा आकडा वाढू शकतो, असे सांगण्यात येत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times