म. टा. प्रतिनिधी, नागपूर

पेंच व बोर व्याघ्रप्रकल्प आणि उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात १ ऑक्टोबरपासून पर्यटनाला प्रारंभ होत आहे. जंगलातील रस्त्यांची योग्य स्थिती असलेल्या भागातच ही सफारी सुरू केली जाईल. केवळ ऑफलाइन पद्धतीने सफारीचे बुकिंग करता येणार आहे. सोमवारी ताडोबा प्रकल्प व्यवस्थापनानेही कोअरमधील पर्यटनाची दारे उघडली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.

ऑफलाइन पद्धतीने १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान प्रकल्पांच्या प्रवेशद्वारांवर सफारीचे बुकिंग करता येईल. १६ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांना ऑनलाइन पद्धतीने ५० टक्के सफारी वाहनांचे बुकिंग करता येईल. १ नोव्हेंबर, २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीत नियमित ऑनलाइन बुकिंग सेवा उपलब्ध राहील. करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या एकूण क्षमतेपैकी फक्त ५० टक्के पर्यटकांना प्रवेश देण्यात येईल. एका खुल्या जिप्सीत १ वाहनचालक, एक गाइड आणि चार पर्यटक राहतील. खासगी गाड्यांच्या बाबतीत ५० टक्के पर्यटक संख्या ही गाडीनुसार निश्चित करण्यात येईल. सफारी दरम्यान सुरक्षित अंतराचे नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे.

सिलारीत निवासाला परवानगी

पेंच व्याघ्रप्रकल्पातील सिलारी येथील पर्यटन संकुलात एकूण क्षमतेच्या ३० टक्क्यांपर्यंत निवासास परवानगी देण्यात येईल. सुरेवानी आणि कोलितमारा येथील पर्यटन संकुलात सध्या उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. सुरेवानी आणि पवनी येथे खासगी वाहनांपैकी केवळ जीप आणि एसयुव्ही वाहनांना परवानगी देण्यात येईल. बोर धरण आणि कऱ्हांडला प्रवेशद्वारांवर जिप्सी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. अतिपावसामुळे आडेगाव प्रवेशद्वार बंद राहणार आहे. प्रवेश व इतर शुल्क हे मागील पर्यटन हंगामानुसार राहणार आहे. ऑनलाइन सफारी आरक्षण आणि निवास आरक्षणासाठी www.mahaecotourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.

अर्धा तास आधी हवी उपस्थिती

पर्यटनास येणार्‍या प्रत्येकाची थर्मल गनद्वारे तपासणी केली जाईल. यांचे तापमान अधिक आढळेल त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवले जाईल. याकरिता सर्व पर्यटकांनी प्रवेशाच्या किमान अर्धा तास आधी प्रवेशद्वारावर उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे. सर्व गाइड, पर्यटक आणि वाहनचालक यांना मास्क, फेसशिल्ड बंधनकारक राहील. याशिवाय सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण बंधनकारक राहील. पर्यटकांना स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात येतील आणि प्रत्येक वापरानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. याशिवाय, जिप्सींच्या टायरचे निर्जंतुकीकरण केले जाईल. सर्वांना आरोग्यसेतू अ‍ॅप वापरणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत वापरलेल्या गोष्टी वनक्षेत्रात किंवा अन्य क्षेत्रात फेकल्या जाणार नाही याची काळजी सर्वांना घ्यावी लागणार असल्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here