कांदा विक्रीतून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत होते. पण हे पैसे शेतकऱ्यांना मिळू न देण्याचा सरकराने घाट घातला आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं महापाप सरकार करत असल्याचा आरोप करतानाच केंद्राच्या या निर्णयातून सरकार शेतकरी विरोधी असल्याचं दिसून येत असल्याची टीका अजित पवार यांनी केली. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यात बोलताना अजित पवार यांनी ही टीका केली.
तर, केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असे सांगतानाच कांदा निर्यात बंदीचा केंद्राने फेरविचार करावा, अशी मागणी पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे. देशातील एकूण कांदा उत्पादनाचा विचार केला तर महाराष्ट्रात ७५ टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते. निर्यातीमध्ये सुद्धा जवळपास ८० टक्के कांदा हा राज्यातील शेतकरी बांधवांचा असतो. त्यामुळे या शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होईल, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा काल केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन कांदा निर्यातबंदी संदर्भात चर्चा केली.तसेच राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू झाली आहेत, लिलाव थांबले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादाजी भिसे यांच्याशी चर्चा करून केंद्र शासनाला कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी विनंती करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times